सातारा : बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षांचा चिमुरडा ठार | पुढारी

सातारा : बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षांचा चिमुरडा ठार

ढेबेवाडी (सातारा); पुढारी वृत्तसेवा

ऊस तोडणीसाठी चिमुरड्याला बरोबर घेऊन निघालेल्या ऊस तोडणी कामगारांच्या चार वर्षाच्या चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले. ही दुर्देवी घटना आज (सोमवार) सकाळी साडेसहा ते पावणेसात वाजण्याच्या सुमारास येणे (ता. कराड) येथे घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी तांबवे तालुका कराड येथे नऊ वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. आकाश बिगाशा पावरा असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या कारखान्यांचा हंगाम जोरात सुरू असून गावागावांमध्ये शिवारात ऊसतोडणी कामगारांचा वावर दिसून येत आहे. येणके येथेही ऊस तोडणी कामगारांकडून ऊस तोडणी केली जात आहे.

आज सकाळी येणके-करपे रस्त्यावरून इनाम नावच्या शिवारात ऊस तोडणीसाठी कामगार निघाले होते. या ऊस तोडणी टोळीतील काही कामगार पुढे चालले होते तर एक महिला चार वर्षांच्या चिमुरडीला घेऊन त्यांच्या पाठीमागे निघाली होती.

याच संधीचा फायदा घेऊन बिबट्याने ऊस तोडणी कामगारांच्या पाठीमागे असलेल्या चिमुरड्यावर हल्ला केला. बिबट्याने त्याला उचलून उसाच्या फडात नेले. यावेळी महिलेने आरडाओरडा करताच ऊस तोडणी कामगार मागे फिरले. ही बाब काही क्षणातच गावात समजल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. ऊस तोडणी कामगारांसह ग्रामस्थांनी चिमुरड्याचा उसाच्या फडात शोध सुरु केला. त्यावेळी उसाच्या फडात काही अंतरावर चिमुरड्याचा मृतदेह आढळून आला.

Back to top button