IND vs NZ : भारत-न्यूझीलंड कसोटीसाठी १०० टक्के प्रेक्षकांना परवानगी | पुढारी

IND vs NZ : भारत-न्यूझीलंड कसोटीसाठी १०० टक्के प्रेक्षकांना परवानगी

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) संघांतील मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर तीन डिसेंबरला सुरू होणार्‍या कसोटी सामन्याकरिता महाराष्ट्र शासनाकडून मुंबई क्रिकेट असोसिएशनला (एमसीए) १०० टक्के प्रेक्षकांना परवानगी मिळाली आहे. यासोबतच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वांद्रे-कुर्ला संकुल येथे भारतीय कसोटी विशेषज्ञ खेळाडूंसाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

वानखेडे स्टेडियममध्ये होणार्‍या दुसर्‍या कसोटी सामन्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून एमसीएला १०० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीची परवानगी मिळाली आहे. सोमवारपासून वांद्रे-कुर्ला संकुल येथे खेळाडूंना तयारी करण्यासाठी कॅम्पचे आयोजनही केल्याचे सूत्रांनी सांगितले. (IND vs NZ)

कसोटी विशेषज्ञ खेळाडू ज्यामध्ये अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, उमेश यादव, मयांक अग्रवाल, शुभमन गिल, रिद्धिमान साहा यांचा या कॅम्पमध्ये सहभाग असेल. यापूर्वी एमसीएकडून महाराष्ट्र शासनाला १०० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीसाठी पत्र लिहिले होते.

भारत-न्यूझीलंड टी-२० मालिकेला १७ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून, तीन टी-२० सामन्यांनंतर दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळविण्यात येणार आहे. पहिली कसोटी कानपूर (२५ ते २९ नोव्हेंबर) आणि दुसरी कसोटी मुंबई (३ ते ७ डिसेंबर) येथे होणार आहे.

भारताचा कसोटी संघ : (IND vs NZ)

अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), लोकेश राहुल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, रिद्धिमान साहा (यष्टिरक्षक), के. एस. भरत (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा. (विराट कोहली दुसर्‍या कसोटीसाठी ताफ्यात दाखल होणार.)

भारताविरुद्ध दोन कसोटींसाठी मिचेल न्यूझीलंड संघात

वेलिंग्टन : फॉर्मात असलेला फलंदाज डॅरेल मिचेलला भारताविरुद्ध होणार्‍या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दुखापतग्रस्त डेवोन कॉनवेच्या जागी संघात स्थान दिले आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या उपांत्यफेरीत कॉनवेचा हात फ्रॅक्चर झाला होता, त्यामुळे भारत दौर्‍यातून तो बाहेर पडला.

कॉनवे पुढील आठवड्यात भारताविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेनंतर टी-20 संघासोबत मायदेशी परतेल, तर मिचेल कसोटी मालिकेसाठी तिथेच राहील. मिचेलने कसोटी क्रिकेटमध्येसुद्धा आपण चांगली कामगिरी करू शकतो हे सिद्ध केले आणि कसोटी संघासोबत आल्याने तो उत्साहित असेल असे न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले.

जयपूरमध्ये 17 नोव्हेंबरला सुरू होणार्‍या तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंड संघ सोमवारी भारतात पोहोचेल. दुसरा टी-20 सामना रांचीमध्ये 19 नोव्हेंबरला, तर तिसरा कोलकात्यामध्ये 21 नोव्हेंबरला खेळविण्यात येईल. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिली कसोटी 25 नोव्हेंबरला, तर दुसरी कसोटी तीन डिसेंबरला खेळविण्यात येईल.

Back to top button