पाटण नगरपंचायत आरक्षण सोडत : इच्छुकांची संख्या घटून नाराजांची वाढली | पुढारी

पाटण नगरपंचायत आरक्षण सोडत : इच्छुकांची संख्या घटून नाराजांची वाढली

पाटण : गणेशचंद्र पिसाळ

पाटण नगरपंचायत सदस्य आरक्षण सोडतीत अनेक मान्यवर इच्छुकांच्या दांड्या गुल झाल्याने यापूर्वी इच्छुकांइतकीच आता नाराजांची संख्या वाढलेली आहे. हक्कांचे प्रभाग हुकल्याने आजूबाजूच्या पर्यायी प्रभागात संबंधितांची चाचपणी केली तरी बहुतांशी प्रभाग हे संबंधितांना अडचणीचे ठरणार असल्याने अनेकांचा राजकीय स्वप्नभंग झाला आहे. या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरून राजकारण, समाजकारण व काहींची अर्थकारणाची समीकरणेच आरक्षणाने उधळून लावली आहेत.

आता पुन्हा पाच वर्षे आरक्षणाची वाट पाहत ऐन उमेदीचा काळ जनसेवेत घालवायचा ठरवला तरी पाच वर्षांनंतरही अपेक्षा पूर्ण होण्याच्या शक्यता धुसरच असल्याने अनेक आजी, माजी पदाधिकारी, नगरसेवक व तब्बल पाच वर्षे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांनी आता मूळचा शेती अथवा इतर धंदा, व्यवसाय आदींकडेच लक्ष घालण्याच्या सामाजिक चर्चांना शहरातआता चांगलेच उधाण आले आहे.

पाटणला 5 वर्षांपूर्वी ग्रामपंचायत होती, तालुक्याचे ठिकाण म्हणून त्याचे नगरपंचायतीत रुपांतर झाले. ग्रामपंचायतीच्या तुलनेत नगरपंचायतीला भरीव निधी प्राप्त झाला. पूर्वी ग्रामपंचायतीत सदस्य असायचे; पण नगरपंचायत झाल्याने नगरसेवक तथा मेहरबान पदाची राजकीय बढती मिळाली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा

नगरविकास खात्याकडून मिळणारा भरीव निधी त्यातून प्रभाग, शहरातील कोट्यवधींच्या कामातून सार्वजनिक, राजकीय तर काहींना वैयक्‍तिक लाभही झाला. स्वाभाविकच नगर पंचायतीच्या माध्यमातून मेहरबानांवर झालेली सार्वत्रिक मेहरबानी लक्षात घेता अनेकांना मेहरबान पदाची स्वप्ने पडली. त्यादृष्टीने त्यांनी गेल्या पाच वर्षांत तशी तयारी व समाजसेवाही केली; पण दुर्दैवाने यात बहुतांशी मंडळींचा अपेक्षाभंग झाला.यात काही उमद्या व खरोखरच मनापासून समाजसेवा करणार्‍या अनेक तरुणांचाही भ्रमनिरास झाला आणि सत्तेच्या लोण्याच्या गोळ्यावर डोळा ठेवून बसलेल्या काहींना आरक्षणाने चांगलीच चपराक लगावली आहे. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्‍त केली आहे.

‘पैसा’ पाण्यात आणि ‘देव’ पाण्याबाहेर

नगरसेवक, विषय समिती सभापती ते अगदी नगराध्यक्ष, उप नगराध्यक्ष पदाची अपेक्षा ठेऊन दोन-तीन वर्षांपासून काहींनी आपल्या मूळच्यासह आजूबाजूच्या प्रभागातील मतदार व प्रसिद्धीसाठी वारेमाप पैसा केला; पण आरक्षणात त्यांच्या अपेक्षा भंग पावल्या. आरक्षण सोडतीच्या निमित्ताने काहींनी अक्षरशः देवही पाण्यात ठेवले होते त्यांचे पाण्यातले देव पाण्याबाहेर आले, मात्र चार वर्षे पदाच्या अपेक्षेने खर्च केलेला पैसा मात्र दुर्देवाने पाण्यात गेल्याची खंत अनेकांच्या चेहर्‍यांवर स्पष्टपणे जाणवत आहे.

पाटणला फेरसोडत नाही

शुक्रवारी झालेली पाटण नगरपंचायत आरक्षण सोडत ही ओ.बी.सी. आरक्षण व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला धरुनच झालेली
आहेत. येथे ओ.बी.सी. साठी चार जागा आरक्षित ठेवण्यात आल्याने फेर सोडतीची गरज नाही. त्यामुळे झालेली आरक्षण सोडत ही अधिकृत असून त्यानुसारच पुढील कार्यवाही होईल, अशी माहिती उप विभागीय अधिकारी सुनील गाढे व नगरपंचायत मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांनी दिली.

पाहा व्हिडिओ

पंचगंगा नदी गिळतेय काठावरची शेती : काठावरच्या शेतकऱ्यांवर संकट

Back to top button