शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार | पुढारी

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार

मुंबई/पुणे : पुढारी ऑनलाईन डेस्क

मराठा साम्राज्याचा सखोल अभ्यास ज्यांनी केला ते पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले. गेल्या तीन दिवसांपासून बाबासाहेबांची प्रकृती चिंताजनक होती. आज सोमवारी सकाळी ५:०७ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

”शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवशाहीर पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ”शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राने साहित्य, कला क्षेत्रातील अध्वर्यू गमावला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!” असे शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पार्थिव सकाळी आठ ते दहा या वेळेत पर्वती पायथा येथील त्यांच्या वाड्यावर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आपल्या रसाळ, लालित्यपूर्ण शैलीने शिवाजीमहाराजांचे चरित्र उभ्या महाराष्ट्राच्या घराघरात नेणाऱ्या, अमोघ वक्तृत्वाने मराठीजनांना खिळवून ठेवून त्यांच्यात वीरश्री अन राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवण्याचा शब्दयज्ञ तब्बल साठहून अधिक वर्षे करणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे वयाच्या शतकामध्ये पदार्पण केल्यानंतरच्या साडेतीन महिन्यांनी देहावसान झाले.

प्रचंड व्यासंग, उत्साहाचा धबधबा असल्याने भव्यदिव्य अन हिमालयाहून अधिक उंचीचे एकाहून एक सरस असे उपक्रम अखेरच्या महिन्यापऱ्यंत करणारी प्रेरणाज्योत विझल्याने सह्यगिरीतील गडेकोट अन दऱ्याखोऱ्या मुक्या झाल्या आहेत.

वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार…

दरम्यान, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अंत्यदर्शनासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी पुण्याकडे रवाना झाल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी देखील पुण्याकडे रवाना झाल्या आहेत. बाबासाहेबांची अंत्ययात्रा त्यांच्या पर्वती पायथा येथील वाड्यापासून सकाळी अकरा वाजता निघेल आणि त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.


Back to top button