सातारा : सज्जनगड येथे मशालोत्सव उत्साहात | पुढारी

सातारा : सज्जनगड येथे मशालोत्सव उत्साहात

परळी (सातारा); पुढारी वृत्तसेवा :

किल्ले सज्जनगडावर दीपावलीच्या पहिल्या पहाटे मशालोत्सव मोठ्या उत्साहात झाला. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी जय भवानीच्या जयघोषात किल्ले सज्जनगड दणाणून निघाला.

किल्ले सज्जनगडावर पहाटे चार वाजल्यापासूनच दुर्गप्रेमी दाखल झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून मशाल उत्सवास प्रारंभ करण्यात आला. शिवाजी महाद्वार श्री समर्थ महाद्वार झेंडूच्या फुलांनी सजविण्यात आले होते. तसेच सज्जनगड पायरी मार्ग पणत्यांनी उजळला होता.

छत्रपती शिवाजी महाराजांचा गर्जनेने प्रारंभ करण्यात आला. दुर्गप्रेमी समर्थभक्त भाविकांनी मशालोत्सवास गर्दी केली होती. गडावरील महाद्वार, अंगलाई देवी मंदिर, पेठेतील मारुती मंदिर, श्रीधर कुटी, श्री समर्थ समाधी मंदिर अशी प्रदक्षिणा पूर्ण करून मशालोत्सव साजरा करण्यात आला.

फटाक्यांची आतिषबाजी तसेच शेकडो मशालीमुळे सज्जनगड प्रकाशमय झाला होता. तसेच यावेळी शिवरायांची वेशभूषा केलेले मावळे सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. या कार्यक्रमाचे आयोजन परळी पंचक्रोशीतील शिवसमर्थ भक्त दुर्ग संवर्धक यांनी केले होते. तसेच यापुढेही गड संवर्धनाचे व गड-किल्ल्यांचा तेजोमय इतिहास भावी पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी असे अनेक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार असल्याचे शिवभक्तांकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचलं का?

Back to top button