अनिल देशमुख यांच्या २७ कंपन्यांचा तपास | पुढारी

अनिल देशमुख यांच्या २७ कंपन्यांचा तपास

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मनी लाँड्रिंगप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 13 कंपन्या आणि नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींच्या नावावर 14 कंपन्या आहेत. तसेच कागदोपत्री आणखी काही कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. ईडीने ही माहिती न्यायालयात दिली असून त्याआधारे याप्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांच्या आधारे केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तपास करत गुन्हा दाखल केला. याच गुन्ह्याच्या आधारे ईडीसुद्धा गुन्हा दाखल करुन तपास करत आहे. ईडीने 13 तासांच्या चौकशीअंती सोमवारी रात्री एकच्या सुमारास देशमुखांना अटक केली. त्यानंतर ईडीने मंगळवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असताना अनेक खुलासे केले आहेत.

ईडीने देशमुखांची कोठडी मागताना त्यांनी बनावट शेल कंपन्या तयार करण्यापासून ते बार मालकांकडून वसुली आणि ट्रस्टच्या नावाखाली हवालामार्फत पैशांचे व्यवहार केल्याचे अनेक आरोप त्यांच्यावर लावले आहेत. या प्रकरणाच्या तपासात अनेक महत्त्वाचे दुवे शोधायचे असून समोर आलेल्या माहितीची पडताळणी करायची आहे, त्यासाठी अनिल देशमुखांची कोठडी आवश्यक असल्याचे ईडीने न्यायालयाला सांगितले.

ईडीच्या न्यायालयातील दाव्यानुसार, अनिल देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 13 कंपन्या आहेत. तर, नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींच्या नावावर 14 कंपन्या आहेत. तसेच फक्त कागदोपत्री उल्लेख असलेल्या आणखी काही कंपन्या सापडल्या आहेत. यातील बहुतांश कंपन्या या शेल कंपन्या आहेत आणि त्यांचा गैरवापर पैसा वळविण्यासाठी केला जात होता. अनिल देशमुख किंवा त्यांच्या कुटुंबीयांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नियंत्रण या कंपन्यांवर आहे.

देशमुखांच्या या कंपन्यांच्या बँक अकाउंटची छाननी केली असता, पैशाचा ओघ वेगात असल्याचे स्पष्ट होते. अनेक कंपन्या अशा समोर आल्या की त्यांचा मुळात काहीही व्यवसाय नाही. मात्र या कंपन्यांचे अस्तित्व दाखवून पैसे मोठ्या प्रमाणात वळवले गेले आहेत. अनिल देशमुख हे अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळांमध्ये हस्तक्षेप करत असून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचाही त्यात सहभाग आहे. अनेक शेल कंपन्यांमध्ये डमी संचालक मंडळे तयार करण्यात आली आहेत. असेही ईडीने सांगितले.

या प्रकरणाच्या तपासाच्या अनुषंगाने ईडीने अनेक वेगवेगळ्या बँक खात्यांच्या व्यवहारांचा ताळेबंद तपासला आहे. त्यात अनिल देशमुख यांच्या साथीदारांच्या कंपन्यांवरून देशमुख कुटुंबीयांचे नियंत्रण असलेल्या कंपन्यात व्यवहार झाले असल्याचे निष्पन्न झाले आहे. ईडीने जून महिन्यात सहा कंपन्यांच्या मुंबई, नागपूर, अहमदाबाद येथे असलेल्या ठिकाणांवर छापे टाकले. यात कंपनीचे संचालक, भागधारक आणि दोन सहायकांचे जबाब नोंदवले आहेत.

ईडीच्या तपासादरम्यान, श्री साई शिक्षण संस्थान, नागपूरमध्ये चेकद्वारे आर्थिक व्यवहाराची माहिती समोर आली आहे. श्री साई शिक्षण संस्थान हे धर्मादाय ट्रस्ट आहे. शिवाय संचालक अनिल देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय सदस्य सोबतच त्यांचे पीए कुंदन शिंदे देखील आहेत. ही संस्था नागपुरातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निकची मोठी संस्था आहे. या ट्रस्टच्या खात्यात दिल्लीच्या चार कंपन्यांमार्फत 04 कोटी 18 लाखांचा व्यवहार काही महिने सुरू होता. पुढील तापसणीमध्ये दिल्लीच्या पत्त्यावर अनेक कंपन्या असल्याचे आढळून आले आहे.

दरम्यान अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून सचिन वाझे याने 40 लाख रुपयांची टोकन मनी घेत 02.66 कोटी रुपये कलेक्शन केले होते. अनिल देशमुख यांच्याकडून आपल्याला प्रत्येक बारकडून 03 लाख रुपये वसूल करण्याचे निर्देश होते आणि प्रत्येक महिन्याचे टार्गेट 04.70 कोटी ठेवण्यात आले होते, असा जबाब सचिन वाझे याने दिल्याचे ईडीने सांगितले.

ईडीच्या रडारवर असलेल्या कंपन्या

मेसर्स राबिया लॉजिस्टिक प्रा. लि., मेसर्स ब्लॅक स्टोन लॉजिस्टिक प्रा. लि., मेसर्स काँक्रीट एंटरप्राइज प्रा. लि., मेसर्स नॉटिकल वेअरहाउसिंग प्रा. लि., मेसर्स पॅराबोला वेअरहाऊसिंग प्रा. लि., मेसर्स बायो-नॅचरल ऑरगॅनिक प्रा. लि., मेसर्स काटोल एनर्जी प्रा. लि., मेसर्स सब्लाइम वेअरहाउसिंग प्रा, लि., मेसर्स विश्वेश लॉजिस्टिक प्रा. लि., मेसर्स अरोमा एंटरप्राइजेस प्रा. लि., मेसर्स मिन्ट्री प्रीमियर लाइफस्टाइल अँड ब्युटी प्रा. लि., मेसर्स मृगतृष्णा ट्रेडिंग प्रा. लि. आणि ट्रॅव्होटेल्स हॉटेल.

ईडीच्या म्हणण्यानुसार, मेसर्स रिलायबल फायनान्स कॉर्पोरेशन प्रा. लि., मेसर्स व्हीए रियल कॉन प्रा. लि., मेसर्स उत्सव सिक्युरिटीज प्रा. लि. आणि मेसर्स सीतल लीजिंग अँड फायनान्स प्रा. लि. या चार कंपन्या फक्त कागदावरच अस्तित्वात आहेत. ज्या केवळ व्यवहारांसाठी तयार करण्यात आल्या होत्या. या चार सेल कंपन्यांचे सुरेंद्र कुमार जैन आणि वीरेंद्र जैन हे बनावट संचालक होते.

अनिल देशमुख यांचा मुलगा हृषिकेश देशमुख याने काळा पैसा पांढरा करण्याचा मार्ग शोधला आहे. तो अशा एका व्यक्तीच्या शोधात होता जो देणगी किंवा कर्जाच्या स्वरूपात रोख रक्कम ट्रस्टच्या खात्यात जमा करेल. असे सुरेंद्र कुमार जैन आणि वीरेंद्र जैन या दोघांकडे करण्यात आलेल्या चौकशीत समोर आले आहे. हृषिकेश देशमुख या जैन बंधूंना अगोदरपासून ओळखत होता. हृषिकेश देशमुखच्या सांगण्यावरून हवालाद्वारे नागपूरहून दिल्लीत 04 कोटी 18 लाख रुपये पोहोचले आणि त्यानंतर हृषिकेश देशमुखने बनावट कंपन्या बनवल्या. आणि त्यामार्फत नागपूरच्या श्री साई शिक्षण संस्थानच्या चॅरिटेबल ट्रस्टमध्ये ठेवले. अशाप्रकारे पैशाचे काळ्यातून पांढरे रूपांतर करून ट्रस्टमध्ये कायदेशीर देणगी दिली. असे ईडीचे म्हणणे आहे.

Back to top button