राहुल द्रविड याची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड | पुढारी

राहुल द्रविड याची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : माजी कर्णधार व ‘द वॉल’ राहुल द्रविड ची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आल्याची घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी केली. या घोषणेबरोबरच प्रशिक्षकपदाबाबतच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.

द्रविडने प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल केल्यानंतर तो या पदावर विराजमान होणार हे जवळपास निश्‍चित समजले जात होते. द्रविडची निवड ही दोन वर्षांसाठी करण्यात आली असून, 2023 ला भारतात होणार्‍या 50 षटकांच्या विश्‍वचषक स्पर्धेपर्यंत तो या पदावर असेल. दरम्यान, विद्यमान प्रशिक्षक रवी शास्त्री यांची मुदत सध्या सुरू असलेल्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर संपणार आहे.

47 वर्षीय द्रविडने खेळाडू म्हणून देखील भारतासाठी चमकदार कामगिरी केली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांची द्रविडच्या नावाला पसंती होती. त्यांनीच द्रविडशी चर्चा करून त्याला या पदासाठी अर्ज दाखल करण्यास तयार केले.

सुलक्षणा नाईक आणि आर. पी. सिंग यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने एकमताने द वॉल राहुल द्रविड च्या नावावर भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून शिक्‍कामोर्तब केले. न्यूझीलंडविरुद्ध मायदेशी होणार्‍या मालिकेत तो टीम इंडियाची सूत्रे आपल्या हातात घेईन, असे बीसीसीआयने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. रवी शास्त्री यांच्या पदाचा कार्यकाळ हा सध्या सुरू असलेल्या टी-20 विश्‍वचषक स्पर्धेनंतर संपणार असल्याने बीसीसीआयने या पदासाठी अर्ज मागविले होते.

Back to top button