मोबाईल आणि लॅपटॉप वापर : गॅजेटप्रेमींचे आजार | पुढारी

मोबाईल आणि लॅपटॉप वापर : गॅजेटप्रेमींचे आजार

डॉ. अतुल कोकाटे

सध्याचा जमाना यंत्रयुगाचा आहे. प्रत्येकजण टेक्नोसॅव्ही झाला आहे. मोबाईलविना आपण कोणीही क्षणभरही राहू शकत नाही. सतत मोबाईल जवळ असतोच. खूप जास्त वेळ मोबाईल आणि लॅपटॉपवर बोटांनी काम केल्यास बोटे आणि मनगटातील हाडांच्या समस्या निर्माण होतात किंवा स्नायूंना समस्या निर्माण होतात. असे काही जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. त्यामुळे ही समस्या गंभीर होण्याआधीच सावध व्हा.

आजच्या काळात एखादीच व्यक्ती असेल की जिच्या हाती स्मार्टफोन्स नसतील. अगदी मुलांंपासून ते वृद्ध आजी-आजोबांपर्यंत सर्वांच्या हाती स्मार्टफोन असतोच. प्रत्येक जण समाजमाध्यमांवर काही ना काही कृती करत असतो. इंटरनेट सर्फिंगची सवय आता व्यसनात बदलू लागली आहे. मोबाईल किंवा लॅपटॉपसाठी बोटे आणि मनगट यांचा वापर केला जातो. साहजिकच हे प्रमाण खूप जास्त असेल तर मनगट, बोटे यांची सांधेदुखी, आर्थरायटिस, रिपिटीटीव्ह स्ट्रेस इंज्युरीज तसेच कार्पल टनल सिंड्रोमची समस्या निर्माण होते.

रिपिटीटीव्ह स्ट्रेस इंज्युरी

गेल्या काही वर्षांत स्मार्टफोन्सचा वापर वाढला आहे. आता संपूर्ण टचस्क्रीन मोबाईल आले आहेत. त्यासाठी अंगठा, बोटे वापरली जातात. या सर्वांच्या अतिवापरामुळे बोटे, अंगठा आणि हात यांच्यामध्ये वेदना होण्याचे प्रमाण वाढते. या प्रकारच्या वेदना आणि सांध्याचे आखडणे हे रिपिटीटीव्ह स्ट्रेस इंज्युरी निर्माण करू शकतात. रिपिटीटीव्ह स्ट्रेस इंज्युरी ही एक क्रिया सातत्याने करत राहिल्याने सांध्यांचे लिगामेंट आणि स्नायूबंध यांच्यामध्ये सूज निर्माण करते.

संबंधित बातम्या

ज्या लोकांना टचस्क्रीन स्मार्टफोन्स आणि टॅबलेटवर गेम खेळण्याची सवय असते किंवा टाईप करण्याची सवय असते त्यांच्या बोटांचे सांधे आणि मनगटे यांच्यात वेदना निर्माण होतात. काही वेळा बोटांचा आर्थरायटिस होण्याची शक्यता असते. कोणतीही क्रिया सातत्याने करत राहिल्याने स्नायू, सांधे, स्नायूबंध आणि रक्तवाहिन्या प्रभावित होतात. त्यामुळे रिपिटीटीव्ह स्ट्रेस इंज्युरी होतात.

उदाहरणार्थ मोबाईल फोनवर संदेश टाईप करताना अंगठ्याचा अधिक प्रमाणात वापर होतो त्यामुळे अंगठ्यात कधी-कधी रेडियल स्टिलॉईड टेनोसिनोवाइटिस (डी क्वेरवेन सिंड्रोम, ब्लॅकबेरी थंब किंवा टेक्सटिंग थंब) हा त्रास उद्भवू शकतो. त्यामुळे स्नायूबंध किंवा टेंडनवर प्रभाव पडतो. आणि अंगटा हलवताना वेदना होतात. अर्थात डेस्कटॉप कीबोर्ड वापरणार्‍या व्यक्तींना हा त्रास होतो किंवा नाही याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही.

कार्पल टनल सिंड्रोम

सर्वसाधारण लोक टच स्क्रीनचा वापर चुकीच्या पद्धतीने करतात. सांध्यावर किंवा बोटावर ताण तेव्हा येऊ शकतो तेव्हा टाईप करताना व्यक्ती आपल्या मनगटावर जास्त दबाव टाकते किंवा हात खूप पुढे मागे करते किंवा खूप मागे झुकवते. यामुळे हातांवर ताण येतो. यामुळे होणार्‍या आजारात टनेल सिंड्रोम सर्वात सामान्य असते. मनगटाच्या मधल्या नसेवर दाब पडल्याने हा त्रास होतो.

ज्या व्यक्तींना हातांचा आणि बोटांचा अधिक वापर करावा लागतो जसे टायपिस्ट, मोटर मॅकेनिक यांना हा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. मधुमेह, गाऊट, सांधेदुखीचे रुग्ण तसे अति मद्यपान करणार्‍या लोकांनाही कार्पल सिंड्रोमचा धोका असतो. त्याशिवाय गर्भधारणा, रजोनिवृत्ती आणि गर्भनिरोधक गोळ्यांच्या सेवनाने होणार्‍या संप्रेरकांच्या बदलामुळेही हा आजार होऊ शकतो.

हा आजार अनुवांशिकही असू शकतो. काही लोकांना अनुवांशिकरीत्याच मनगट आणि बोटांच्या नसांचा नैसर्गिक चिकटपणा कमी असतो. नैसर्गिक चिकटपणा कमी असेल तर कार्पल टनेल सिंड्रोम होण्याची शंका अधिक असते. त्याशिवाय काही लोकांच्या मनगट आणि बोटे यांच्या हाडे आणि नसा यांची ठेवण अशा प्रकारची असेल तर त्या व्यक्तींना हा आजार होण्याची शक्यता इतरांच्या तुलनेत अधिक असते. मनगट किंवा हात यांच्या पुढच्या भागात जखम झाल्यासही कार्पल टनेल सिंड्रोम होऊ शकतो.

हाताचे तळवे सुन्न पडणे, मुंग्या येणे, हातामध्ये जोर नसणे, खांद्यापर्यंत हात उचलण्यात वेदना, अंगठा, तर्जनी आणि मधले बोट यांच्यामध्ये संवेदना कमी होणे ही सीटीसी ची प्रमुख लक्षणे आहेत. कार्पल टनेलग्रस्त मनगटामध्ये हाडे आणि कडक झालेले लिगामेंटने वेढलेली बारीक बोगद्यासारखी रचना असते. त्यामुळे मनगट आणि बोटे यांची विविध हाडे एकमेकांशी जोडलेले असतात. कार्पल टनेल मनगटाकडून बोटांमध्ये शिरतो. या बोगद्यातून बोटे आणि अंगठ्यांच्या नसा (फ्लेक्सर टेंडन) आणि मध्य स्नायू (मेडियन नर्व्ह) यामधून जातो.

बचाव कसा करावा?

कामाच्या दरम्यान बोटांना विश्रांती मिळाली तर सूज येणे तसेच दाब कमी होण्यास मदत मिळते. कामाच्या पद्धतीत बदल केल्यास या आजाराला रोखता येते. या आजाराचे निदान वेळेवर झाले तर त्यावर उपचार करणे सोपे जाते. रिपिटीटीव्ह स्ट्रेस इंज्युरिज आणि कार्पल टनेल सिंड्रोमची तपासणी नर्व्ह कंडक्शन परीक्षणाने करता येते.

रोगाच्या प्राथमिक टप्प्यात रात्री मनगटाला स्पिंट किंवा पट्टी बांधून होऊ शकतो. त्यामुळे मनगट वाकवता येत नाही. मनगटाला आराम देणे आणि गोळ्या औषधे घेणे यानेही बरे वाटू शकते. अर्थात स्थिती गंभीर असेल तर कार्पल टनलमध्ये कोर्टिसोनचे इंजेक्शन देता येते. ज्या रुग्णांना या उपचारांचा फायदा होत नाही, त्यांना मात्र शस्त्रक्रियेशिवाय दुसरा उपाय नाही.

Back to top button