नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: देशात कोरोनाविरोधात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेला अधिक वेग देण्याचे आवाहन बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आपापल्या जिल्ह्यात लसीकरण वाढवण्यासाठी 'इनोव्हेटीव्ह' पद्धतीवर जास्त काम करावे लागेल, अशा सूचना देखील त्यांनी जिल्हाधिका-यांना यावेळी दिल्या.
देशात आता 'हर घर टीका, घर घर टीका' याअंतर्गत लसीकरण मोहिम चालवली जाईल. लसीकरणासाठी धर्मगुरुंची मदत घ्या. धर्मगुरुंचे लसीकरणासंबंधीचे व्हिडिओ व्हायरल करा तसेच एनएसएस, एनसीसीची मदत घ्या, असे आवाहनही पंतप्रधानांकडून करण्यात आले.
देशातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाविरोधातील लसीकरणाचा वेग कमी आहे, अशा जिल्ह्यांचा पंतप्रधानांनी बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आढावा घेतला. या बैठकीत ज्या जिल्ह्यामध्ये कोरोनाविरोधातील लसीचा पहिला डोस देण्याचे प्रमाण ५० टक्क्यांहून कमी आणि दुसऱ्या डोसची व्याप्ती अत्यंत कमी असलेल्या ४० जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आभासी पद्धतीने उपस्थित होते.
बैठकीतून पंतप्रधानांनी लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी काही 'टिप्स' जिल्ह्याधिकाऱ्यांना दिल्या. बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह झारखंड, मणिपूर, नागालॅन्ड, अरूणाचल प्रदेश आणि मेघालयचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते.
लसीकरणात हलगर्जीपणा केल्यामुळे अनेक विकसित देशात कोरोनाचे संकट पुन्हा आले आहे. आपण हे मुळीच स्विकारू शकत नाही. हे आपण सहन करू शकणार नाही. त्यामुळे लसीचे दोन्ही डोस वेळेवर घेणे खूप महत्वाचे असल्याचे प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी केले. 'सबको व्हॅक्सिन , मुफ्त व्हॅक्सिन ' मोहिमेअंतर्गत एका दिवसात सुमारे २.५ कोटी लसीचे डोस दिले आहेत. यातून आपली क्षमता काय आहे, आपले सामर्थ्य काय आहे हे दिसून येते." अशी भावना मोदींनी व्यक्त केली.
बिरसा मुंडा जयंतीला आदिवासी बहुल भागात विशेष लसीकरण मोहिम चालवावे असे आवाहन बैठकीनंतर बोलताना पंतप्रधानांनी केले. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, १०० वर्षातील सर्वात मोठ्या महारोगराईने देशासमोर अनेक आव्हाने उभी केली आहेत. आता आपापल्या जिल्ह्यात लसीकरण वाढवण्यासाठी 'इनोव्हेटीव्ह' पद्धतीवर जास्त काम करावे लागेल, 'इनोव्हेटीव्ह' पद्धतीबाबतच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या. घरोघरी लसीकरण मोहिम सुरू असताना पहिल्या डोससह दुसऱ्या डोसवर देखील लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
कोरोनाची रूग्णसंख्या कमी झाल्यावर निष्काळजीपना केला जात असल्याचे दिसून आले आहे. लस घेण्याची घाई करण्याची मानसिकता कमी होते. पंरतु, असे होवू न देता प्रत्येकाने लस घ्यावी, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
प्रत्येक जिल्ह्यातील एका-एका गावात, एका-एका वस्तीसाठी वेगवेगळे धोरण आखायची आवश्यकता पडल्यास यासंबंधी देखील पावले उचलावे. परिसर निहाय २० ते २५ लोकांचे पथक बनवून हे काम केले जावू शकते. या पथकांमध्ये एक निकोप स्पर्धा करण्याचे काम देखील केले जावू शकते, असे पंतप्रधान म्हणाले.
औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी बैठकीतून पंतप्रधानांना लसीकरण वाढविण्यासाठी कुठली पाऊले प्राधान्याने उचलण्यात आली आहे याची माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली 'मिशन कवच कुंडल' अभियान राबवून लसीकरण वाढवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचलंत का?