सातारा : स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास धोका; पुतळ्याखालील बुकिंग रूमचा स्लॅब पाझरतोय | पुढारी

सातारा : स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास धोका; पुतळ्याखालील बुकिंग रूमचा स्लॅब पाझरतोय

प्रतिभा राजे

कराड :  नूतनीकरणानंतरही अनेक समस्यांनी ग्रस्त असणार्‍या स्व. यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन (टाऊन हॉल)मध्ये असणार्‍या बुकिंग रूममध्ये गेल्या चार ते पाच वर्षांपासून गळती लागली आहे. पावसाळ्यात या रूममध्ये तळे साचत असून बुकिंग रूमच्या स्लॅबमधून पाणी पाझरत असते. त्यामुळे या स्लॅबचे लोखंडी पिलर गंजत चालले असून, या स्लॅबवर असणारा स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला धोका निर्माण झाला आहे. कराडचे वैभव असणार्‍या टाऊन हॉलकडे नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने रंगकर्मी तसेच नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

टाऊन हॉलमध्ये वर्षभरात विविध कार्यक्रम होत असतात. अनेक नाटके, विविध कार्यक्रम होणार्‍या या टाऊन हॉलला समस्यांनी ग्रासले आहे. मुळातच याठिकाणी अनेक सुविधांची वानवा आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा ज्या इमारतीवर उभारण्यात आला आहे. त्या बुकिंग रूमची अवस्था दयनीय आहे. सुमारे 30 फूट असणार्‍या या रूममध्ये गेल्या चार ते पाच वर्षांपूर्वीपासून पावसाळ्यात गळती लागलेली आहे. या रूमच्या वर टाऊन हॉलमध्ये जाण्यासाठी पायर्‍या आहेत. या पायर्‍यांच्या मधोमध स्व. यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा आहे. या पुतळ्याचा बराचसा भाग या बुकिंग रूमच्या स्लॅबवर आहे. बुकिंग रूममध्ये गेल्यावरच जुन्या हवेलीमध्ये प्रवेश केल्यासारखे वाटते. स्लॅबच्या गळतीमुळे भिंतींचा रंग तर उडालाच आहे. परंतु या भिंतीवरचे सिमेंटही खराब झाले आहे. रूममध्ये असणार्‍या लाईटच्या पाईप्स तुटलेल्या आहेत. लोखंडी पिलर तर अक्षरश: गंजून काही ठिकाणी फुटलेले आहेत. बुकिंग रूममधील कपाटाची अवस्था अत्यंत घाणेरडी झालेली आहे. जुन्या काळातील हे कपाट बदलून नवीन कपाट देणे पालिकेला शक्य झालेले नाही. टेबलला बँडेज केले आहेत, तर खुर्ची निकामी झालेली आहे. बुकिंग रूमच्या बाहेरच्या भिंतीलाही तडे गेलेले आहेत. दरवाजा मोडकळीत आलेला आहे. बाहेरून अत्यंत देखण्या दिसणार्‍या टाऊन हॉलच्या इमारतीमधील या बुकिंग रूमची अवस्था पाहिल्यावर पालिकेच्या कारभाराबाबत शंका उपस्थित होत आहे.

याबरोबरच टाऊन हॉलमध्ये अनेक असुविधा असून मेकअप रूममध्ये पाणी साचून राहते. बुकिंग रूम पुढच्या बाजूस असणे गरजेचे होते. मात्र आतील बाजूस असल्याने बुकिंगसाठी येणार्‍या लोकांना बुकिंगची रूम शोधावी लागते. हॉलमधील कॅन्टीनचीही तीच अवस्था आहे. कॅन्टीन शेजारीच स्वच्छतागृह असल्याने स्वच्छतागृहाची दुर्गंधी कॅन्टीनमध्ये येत असते.

30 फुटांपैकी 5 फूट सुस्थितीत

बुकिंग रूममधील 30 फुटांपैकी केवळ 5 फूट जागा बर्‍या अवस्थेत आहे. 25 फूट जागेत पावसाळ्यात बसणे म्हणजे शॉवरखाली बसण्यासारखी अवस्था असते. केवळ 5 फुटांची जागा शिल्लक आहे. त्या जागेवर बसून कर्मचारी कसेबसे जेवण करतात. रंगकर्मी, कर्मचार्‍यांनी अनेकदा पालिकेकडे या बुकिंगरूमच्या अवस्थेबाबत माहिती देऊन गळती काढण्याबाबतची मागणी केली आहे. तत्कालिन मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी दुरुस्ती केली होती. मात्र ती दुरुस्तीही तात्पुरती झाली होती. त्यानंतरही अनेकदा पालिकेला कळवूनही याकडे दुर्लक्ष केले आहे.

पायर्‍यांना गेलेत तडे

बुकिंग रूमच्यावरूनच टाऊन हॉलमध्ये जाण्यासाठी पायर्‍या आहेत. या पायर्‍यांना खालच्या बाजूने तडे गेलेले आहेत. ज्या सिमेंटच्या खांबावर या पायर्‍या उभ्या केल्या आहेत, त्या खांबालाही चिरा पडलेल्या आहेत.

Back to top button