सातारा जिल्ह्यातील दोघींना शिवछत्रपती पुरस्कार; प्रतीक्षा मोरे, स्नेहल मांढरेचा सन्मान | पुढारी

सातारा जिल्ह्यातील दोघींना शिवछत्रपती पुरस्कार; प्रतीक्षा मोरे, स्नेहल मांढरेचा सन्मान

सातारा; पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाच्या वतीने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या खेळाडूंसह क्रीडा मार्गदर्शक, संघटक यांना शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित केले जाते. जिल्ह्यातील कारी (ता. सातारा) येथील प्रतीक्षा मोरे हिला मल्लखांब तर पाचवड (ता. वाई)च्या स्नेहल मांढरे हिला आर्चरी या क्रीडा प्रकारासाठी शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे.

मल्लखांबमध्ये उत्तुंग कामगिरी करणार्‍या कारी ता. सातारा येथील प्रतिक्षा लक्ष्मण मोरे हिला सन 2019-20 चा मल्लखांब खेळासाठी शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे. तिचे शिक्षण बी.ए.अर्थशास्त्र झाले असून आई-वडील शेतकरी आहेत. ती समर्थ मल्लखांब संघ, कारी या संस्थेची खेळाडू आहे. तिला प्रशिक्षक म्हणून शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या माया मोहिते, विश्वतेज मोहिते यांनी मार्गदर्शन केले. तिने पहिली जागतिक मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धा 2018-19 साली खेळली आहे. आजपर्यंत तिने वैयक्तिक 3 रौप्यपदके व 1 सांघिक सुवर्णपदक पटकावले आहे. तसेच 6 राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून यांमध्ये 7 सुवर्णपदके 4 रौप्यपदके पटकावली आहेत.

आर्चरी खेळात उत्तुंग कामगिरी करणार्‍या स्नेहल विष्णू मांढरेलाही 2019-20 चा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. स्नेहलने वाई येथे चंद्रकांत भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्चरीचे प्रशिक्षण घेतले. आजारपणामुळे ती काही काळ खेळापासून दूरावली गेली होती. परंतु, तिने जिद्दीने आजारावर मात करत खेळातील नैपुण्य सिद्ध केले. स्नेहल मांढरेने विश्वकरंडक तिरंदाजी स्पर्धेत कंपाऊंडच्या वरिष्ठ संघासाठी कामगिरी बजावली आहे. या दोन्ही शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झालेल्यांचे सातारा जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

Back to top button