सातारा : आ. मकरंद पाटील अजितदादांबरोबर जाणार | पुढारी

सातारा : आ. मकरंद पाटील अजितदादांबरोबर जाणार

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  ‘मकरंद पाटील माघारी फिरा’ या ‘पुढारी’ने वाई-खंडाळा – महाबळेश्वर मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या मागणीचा लेखाजोखा सादर केल्यानंतर आ. मकरंद पाटील यांनी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यासंदर्भात किसनवीर कारखाना कार्यस्थळावर कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक झाल्याचे समजते.

राष्ट्रवादीतील फुटीनंतर राज्याच्या राजकारणात उलथापालथी झाल्यानंतर आ. मकरंद पाटील यांनी ना. अजितदादा पवार यांच्यासोबत स्नेहभोजन घेतले होते. मात्र, दुसर्‍याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या सातारा दौर्‍यात आ. मकरंद पाटील कराडपासून सातारापर्यंत पूर्णवेळ दिसले होते. तत्पूर्वी वाईत झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक खा. शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. राज्यातील बदललेली परिस्थिती, किसनवीर कारखान्यावर असलेले आरिष्ट लक्षात घेवून पाच ते सहा तालुक्यातील शेतकर्‍यांच्या हितासाठी ‘पुढारी’ने ‘मकरंद पाटील माघारी फिरा’ अशी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी दिवसभर आ. मकरंद पाटील यांना ‘पुढारी’च्या वृत्ताचा दाखला देवून आपल्याला शेतकर्‍यांच्या हितासाठी अजितदादांसोबत जावे लागेल, असा कौल दिल्याने आ. मकरंद पाटील यांची द्विधावस्था झाली.

याच कालावधीत उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे ना. निंबाळकर व आ. मकरंद पाटील यांच्या अत्यंत जवळच्या मित्रांनी ‘निर्णय घ्यावा लागेल’, असे आ. मकरंद पाटील यांना सांगितल्यानंतर पाच-सहा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या हितासाठी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय आ. मकरंद पाटील यांनी घेतला असल्याचे समजते. किसनवीर कारखाना कार्यस्थळावर ‘पुढारी’च्या वृत्ताचा हवाला देवून शुक्रवारी महत्वपूर्ण बैठक झाली. ‘पुढारी’ने जे मांडले आहे ते कारखाना कार्यस्थळावरील ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या हिताचे आहे. त्यामुळे मकरंदआबांनी निर्णय घ्यावा व अजितदादांसोबत जावे, असा ठराव करण्यात आला. रात्री उशीरा आ. मकरंद पाटील यांना याबाबतची कल्पना देण्यात आली. त्यामुळे आ. मकरंद पाटील हे अजितदादांसोबत जाणार असल्याचे जवळजवळ निश्चित असून ‘पुढारी’ने याप्रकरणी निर्णायक भूमिका घेतली असल्याची प्रतिक्रिया वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यातील स्व. लक्ष्मणराव पाटील यांच्या समर्थकांनी व्यक्त केली आहे. आता ना. अजितदादा पवार हे आ. मकरंद पाटील यांना कोणते मंत्रीपद देतात?, आ. मकरंद पाटील खरोखरच ना. अजितदादा पवार यांना सोबत करणार का? याविषयी उत्सुकता आहे.

Back to top button