खंडाळ्यात युवकाचे हॉटेलमधून अपहरण; चौघांना अटक | पुढारी

खंडाळ्यात युवकाचे हॉटेलमधून अपहरण; चौघांना अटक

खंडाळा ; पुढारी वृत्तसेवा : पारगाव-खंडाळा बसस्थानका-जवळ असणार्‍या हॉटेलमधून अपहरण केलेल्या व्यक्तीची खंडाळा पोलिसांनी अवघ्या सहा तासांत सुटका केली. याप्रकरणी चार संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान, उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने अपहरण झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

आकाश रघुनाथ टेंगळे (वय 28), अल्ताफ अब्बास इनामदार (वय 40, दोघेही रा. मसोबाचीवाडी पणदरे, बारामती), राहुल भारत सोनावणे (वय 33) व कुलदीप चंद्रकांत जावळे (वय 24, दोघेही रा. माळेगाव बुद्रक ता. बारामती, जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

दि. 8 रोजी विटा, जि. सांगली येथील व्यापारी मिलिंद पिके व त्यांचा मुलगा अनिकेत पिके हे कामानिमित्त पुणे येथे आले होते . पुण्यातील काम संपवून व्यापारी परत जात असताना अनोळखी व्यक्तीने अनिकेतच्या मोबाईलवर फोन करुन व्यवसायानिमित्त बोलायचे आहे असे सांगून त्यांना पारगाव – खंडाळा बसस्थानकाजवळील पूजा बिअर बारमध्ये बोलावून घेतले. त्याप्रमाणे मिलिंद व अनिकेत हे पूजा बारमध्ये आले.

यावेळी संशयित आकाश टेंगळे, अल्पताफ इनामदार, राहूल सोनावणे, कुलदीप जावळे यांनी त्यांना उसने घेतलेले पैसे आताच्या आता परत करा नाहीतर मुलगा अनिकेतला बारामतीला घेवून जाणार असे म्हणत त्याला पळवून नेले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून अनोळखी आरोपी व अपहृत व्यक्तीच्या मोबाईल नंबरचे लोकेशन व गुन्ह्यातील गाडीच्या माहितीवरुन संशयित आरोपींची माहिती घेवून पोनि महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शंकर पांगारे, पोलीस नाईक प्रशांत धुमाळ, तुषार कुंभार यांचे पथक तयार करण्यात आले.

या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार माळेगाव, ता. बारामती येथे शोध घेवून अनिकेतची अवघ्या 6 तासात सुटका केली. या प्रकरणातील संशयित चौघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेची नोंद खंडाळा पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.

Back to top button