भाविकांचे श्रद्धास्थान मांढरदेवची काळूबाई | पुढारी

भाविकांचे श्रद्धास्थान मांढरदेवची काळूबाई

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मांढरदेव येथील काळुबाई देवीची यात्रा दि. 5 ते 7 जानेवारी दरम्यान साजरी होत आहे. सह्याद्री पर्वत रांगांच्या पठारावर मांढरदेव येथील श्री काळेश्वरी देवीचे देवस्थान असून हे तीर्थक्षेत्र समुद्र सपाटीपासून सुमारे 4500 फुट उंचीवर आहे. गेल्या काही वर्षात या देवस्थानस्थळी प्रशासन व देवस्थान ट्रस्टमार्फत सुलभ दर्शनासाठी विविध सुधारणा करण्यात आल्या आहेत.त्यानिमित्त…

सातार्‍यापासून 54 व वाईपासून 22 किलोमीटर अंतरावर मांढरदेवच्या उंच डोंगरावर वसलेली काळुबाई ही राज्यातील व राज्याबाहेरील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान आहे. गच्च झाडीने भरलेल्या उंच डोंगरावरील हे ठिकाण अतिशय रमणीय आहे. उंच डोंगरावर असलेल्या डोंगरातून नागमोडी वळणे घेत जाणार्‍या घाटातून परिसराचे दृश्य अतिशय विलोभनीय दिसते. डोंगराच्या मध्यावर वसलेले मांढरदेव व तेथूनही उंच डोंगरावर असलेले काळुबाईचे देऊळ पाहणार्‍याला मोहात पाडते. देवळानजिक गेल्यावर सर्वत्र दिसणारे निरभ्र आकाश, शांत व प्रसन्न वातावरण यामुळे भाविक काळुबाईप्रमाणे येथील निसर्गाच्या प्रेमात पडतात.

मांढर पर्वतावर असलेली देवी म्हणजे मांढरदेवी होय. पुढे बोलीभाषेतील अपभ्रंशानुसार हिचे नाव मांढरदेवी असे झाले. हिलाच काळेश्वरी किंवा काळुबाई असे म्हणतात. स्त्रिया आपली सुख-दु:ख, व्यथा-वसा, आशा-निराशा या काळुबाईला मनापासून सांगतात. अगदी जशा एखाद्या जवळच्या सखीला सांगाव्यात तशा. विविध गीतातून भौगोलिक, सामाजिक, कौटुंबिक परिस्थितीचे दर्शन आणि देवीभक्ती मागील ओढ आणि उदात्तता ही जाणवते. देवीचे रूप शांत, सौम्य असे आहे.

सह्याद्रीच्या पर्वत रांगाच्या कुशीत निसर्गरम्य परिसरात श्री काळेश्वरी देवीचे देवस्थान आहे. मंदिर परिसरात काळेश्वरी देवीसह देवीचे शिपाई मांगीरबाबा व गोंजीरबाबा यांचीही पुरातन देवालये आहेत. भाविक भक्तीभावाने त्यांचेही दर्शन घेतात. काळेश्वरीचे देवालय मांढरदेव गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर टेकडीवर आहे. काळेश्वरी, काळुबाई, काळुआई अशा वेगवेगळ्या नावाने देवी ओळखली जाते. ही देवी नवसाला पावते अशी येथे येणार्‍या भाविकांची श्रध्दा व भावना आहे. त्यामुळे लाखो भाविक दरवर्षी देवीच्या दर्शनासाठी येथे येतात.

पूर्वी वाईकडून बोपर्डी, धावडी, पिराचीवाडी, गुंडेवाडी तर भोरकडून लोहोम, भोर या गावांच्या बाजूने डोंगर चढून भाविक देवीच्या दर्शनासाठी जात. आज मितीस मांढरदेव येथे श्री काळेश्वरी देवीच्या तीर्थक्षेत्री जाण्यासाठी पुणे जिल्ह्यातून भोर बाजूकडून व सातारा जिल्ह्यातून वाई बाजूकडून रस्ता आहे. दोन्ही बाजूने पक्का डांबरी रस्ता असल्याने व वाहतुकीची असंख्य साधने निर्माण झाल्याने भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरवर्षी पौष पौर्णिमेला देवीची वार्षिक यात्रा भरते. महाराष्ट्र व इतर राज्यातील लाखो भाविक यात्रेनिमित्ताने काळेश्वरी देवीच्या दर्शनासाठी येतात. देवीच्या डोंगराच्या उत्तरेस भाटघर धरणाचा जलाशय व दक्षिणेस कृष्णा नदीवरील धोम धरणाचे अथांग पसरलेले पाणी दिसते. यामुळे हा परिसर अत्यंत नयनरम्य असा आहे. काळेश्वरी देवी वसलेल्या डोंगर रांगांमध्ये पांडवगड असून, दोन्ही बाजूने नागमोडी वळणाचे रस्ते पर्यटकांना व भाविकांना साद घालतात. काळेश्वरी देवीच्या टेकडीवरून सुर्योदय-सूर्यास्ताचे दर्शन घेणे अवर्णनीय असते.

– धनंजय घोडके, वाई

Back to top button