सातारा : वणवा लावणार्‍यांना ५०० रोपे लावण्याची शिक्षा; कराड न्यायालयाचा निकाल | पुढारी

सातारा : वणवा लावणार्‍यांना ५०० रोपे लावण्याची शिक्षा; कराड न्यायालयाचा निकाल

कराड ; पुढारी वृत्तसेवा : स्वतःच्या मालकीच्या जागेतील बांध व पालापाचोळा जाळत असताना वन क्षेत्रामध्ये वणवा पसरला. याची दखल घेऊन वन विभागाने संशयतावर गुन्हा नोंद केला. याप्रकरणी न्यायालयाने दोघांना तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली असून त्या दंडाच्या रकमेतून प्राण्यांसाठी पाण्याची सोय करावी. तसेच दोन्ही आरोपींनी सावली देणार्‍या वेगवेगळ्या प्रजातींची एकूण 500 रोपांची लागवड करून त्याचे संगोपन करावे, असा निकाल न्यायालयाने दिला असल्याची माहिती कराड वनपरिक्षेत्राचे अधिकारी तुषार नवले यांनी दिली.

राजेंद्र शंकर शेवाळे व वसंत बाबुराव शेवाळे (दोघेही रा. म्हासोली-शेवाळेवाडी, ता. कराड) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत तुषार नवले यांनी सांगितले की, कराड वनपरिक्षेत्रांतर्गत कोळे मंडलामधील महसुली नियतक्षेत्रातील घोगाव येथे राखीव वनक्षेत्रामध्ये वनवा लागल्याचे समजले होते. त्यावेळी त्वरित घटनास्थळी भेट देवून वन कर्मचार्‍यांच्या सहकार्याने वणवा विझवला होता. तोपर्यंत या वनव्याची झळ वनक्षेत्राला बसली असून नैसर्गिक रोपे तसेच झाडांचे नुकसान झाले होते.

याबाबत संशयतांवर न्यायालयात तक्रार दाखल करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यानुसार प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एस. ए. विराणी यांच्यासमोर युक्तिवाद झाला. सरकारी वकील रोहिणी पाटील यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून राजेंद्र शेवाळे व वसंत शेवाळे यांना दोषी धरत न्यायालयाने प्रत्येकी पंधराशे रुपये असे एकूण तीन हजार रुपये दंडाची शिक्षा केली.

तसेच आरोपींनी नुकसान भरपाई म्हणून प्राण्यांसाठी पाणवट्याची सोय करावी. याशिवाय दोन्ही आरोपींनी मिळून सावली देणारी वेगवेगळ्या प्रजातींची एकूण पाचशे रोपांची लागवड करून त्यांचे संगोपन करावे, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे.

सातारचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली कराडचे वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार नवले, बाबुराव कदम, सुभाष गुरव यांनी याचा तपास केला. त्यांना तपासात सचिन खंडागळे, शंकर राठोड, भारत खटावकर यांनी सहकार्य केले.

शेताचा बांध जाळताना लागला वणवा…

याबाबत वन अधिकारी व कर्मचार्‍यांनी आजूबाजूच्या परिसरामध्ये कसून चौकशी केली असता सदरचा वनवा हा राजेंद्र शेवाळे, वसंत शेवाळे यांनी लावल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी त्यांच्या मालकी क्षेत्रामधील शेताचा बांध व पालापाचोळा जाळत असताना वनक्षेत्रामध्ये वनवा पसरला असल्याचे समजले. यावरून त्यांच्यावर वन कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता.

Back to top button