सातारा : महादेव मंदिराच्या पायामध्ये आणखी एक मंदिर; इतिहास संशोधकांचा दावा | पुढारी

सातारा : महादेव मंदिराच्या पायामध्ये आणखी एक मंदिर; इतिहास संशोधकांचा दावा

परळी; सोमनाथ राऊत :  किल्ले सज्जनगडाला सुरुवातीच्या काळात परळीचा किल्ला असे संबोधले जात. या किल्ल्याच्या पायथ्याशी परळी गाव प्राचीन काळापासून वसलेले असून उरमोडी धरणाच्या व नदीच्या जवळच महादेव मंदिर आहे. या मंदिराला ऐतिहासिक महत्व असून त्याच्या पायामध्ये आणखी एक मंदिर असण्याचा दावा इतिहास संशोधकांनी केला आहे. या मंदिराच्या संवर्धनासाठी पुरातत्त्व विभागाने प्रयत्न करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

परळीतील महादेव मंदिराचा इतिहासही फार जुना आहे. सुमारे सातशे ते आठशे वर्षांपुर्वीचे हे मंदिर आहे. सध्या ते सुस्थितीत असून याठिकाणी मंदिराच्या उजव्या बाजूला दोन वर्षांपुर्वी पुरातत्त्व विभागाचे सहसंचालक विलास वहाने यांच्या सांगण्यावरुन टिकावाने काही उत्खनन करण्यात आले होते. त्यावेळी दगडी बांधकाम आढळून आले होते. त्याचे संशोधन होणे गरजेचे आहे. सध्या मंदिराच्या बाहेर युध्दात वीरमरण आलेल्या विरांच्या स्मृती जतन केल्या असून विरांसाठी सती गेलेल्या सतीशिळांचाही येथे समावेश आहे.

महादेव मंदिराच्या पाहणीसाठी पुरातत्त्व खात्याचे अधिकारी आत्तापर्यंत फक्त एक किंवा दोन वेळा येऊन गेले असतील. इतिहास संशोधक व अभ्यासक मंडळींच्या म्हणण्यानुसार या वास्तू पुरातन विभागाकडे नोंदणीकृत आहे. अशा मंदिराच्या संवर्धनासाठी पुरातत्त्व विभागाकडून प्रयत्न होत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.

परळी येथील केदारेश्वर मंदिराची ट्रस्ट १९५३ सालची आहे. तेव्हापासूनची या ट्रस्टची वंशावळ सभासद नुतनीकरण अशी कामे लांबली होती. ही कामे आता प्रगतीपथावर असली तरी या केदारेश्वर ट्रस्टवर जे सभासद इच्छुक असतील त्यांनी या मंदिराच्या संवर्धनासाठी व जीर्णोद्धारासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी परळी ग्रामस्थांची आहे.

संवर्धन तातडीने होण्याची गरज…..

परळी येथील महादेव मंदिर अतिप्राचिन आहे. येथे असलेल्या मंदिराच्या पायामध्ये बांधकाम असण्याची शक्यता आहे. या ठिकाणचे खोदकाम होणे गरजेचे आहे. हे खोदकाम मंदिराचा कळस व इतर वास्तूंचे संवर्धन या अनुषंगाने व्हावे. पुरातत्त्व विभाग, ट्रस्ट, लोकप्रतिनिधी यांची सांगड घालून ते करणे गरजेचे असल्याचे जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्था अध्यक्ष विक्रांत मंडपे यांनी सांगितले.

Back to top button