सातारा : बिबट्यानंतर आता तरस शिरले घरात; नागरिकांमध्ये घबराट (Video) | पुढारी

सातारा : बिबट्यानंतर आता तरस शिरले घरात; नागरिकांमध्ये घबराट (Video)

सातारा ; पुढारी वृत्तसेवा सातारा शहरातील मंगळवारपेठ या भरवस्तीत असलेल्या दस्तगीर कॉलनीमध्ये आज (शुक्रवार) सकाळी तरस घुसला. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. तरस दिसेल त्‍या वाटेने पळत असल्‍याने नागरिकांनी घरांचे दरवाजे बंद केले.

वनविभाग घटनास्थळी दाखल 

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना या विषयी माहिती समजताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आता तरसाला पकडण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मात्र हा तरस या दाटीवाटीच्या रहिवाशी भागात कसा आला ते समजू शकले नाही. सातारा शहराच्या पश्चिम भागात हा परिसर आहे. या परिसराला लागून यवतेश्वरचा डोंगर आहे.

सातारा महामार्गावरून सातारा शहराच्या हद्दीमध्ये प्रवेश करताना लिंब फाट्यावरून मोळाच्या ओढ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्री तरस हा प्राणी प्रवाशांना दिसला. त्यानंतर शहरातील मंगळवार पेठेतील एका घरात तरस घुसल्याने नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. यामुळे नागरिकांत घबराटीचे वातावरण तयार झाले. तरस घरात घुसतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्‍याने सातारकरांच्यात बिबट्या पाठोपाठ आता तरसामुळे घबराटीचे वातावरण पसरले आहे.

बिबट्याही घुसला होता घरात 

मौजे हेळवाक (ता पाटण, जिल्हा सातारा) येथील सुधीर कारंडे यांच्या पाळीव कुत्र्याला पकडण्यासाठी बिबट्या थेट त्यांच्या घरात शिरला होता. बिबट्या घरात आल्याचे दिसताच कारंडे यांनी घराचे दार बंद केल्याने तो घरातच अडकून पडला होता. अंगणातील कुत्रा घाबरून घरात पळत आला, त्या मागोमाग त्यास पकडण्यासाठी बिबट्याही घरात आल्याची घटना याआधी साताऱ्यामध्ये घडली होती. हा बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात मध्यरात्री अडकला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pudhari (@pudharionline)

हेही वाचा :  

Back to top button