सातारा : बाजारपेठेत ‘दिवाळी’ सुरु; खरेदीला उधाण | पुढारी

सातारा : बाजारपेठेत ‘दिवाळी’ सुरु; खरेदीला उधाण

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  दिवाळीचा सण आता अवघ्या पाच दिवसांवर आला असून बाजारपेठेतही व्यावसायिकांची दिवाळी सुरु झाली आहे. खरेदीला उधाण आले आहे. प्रमुख बाजारपेठा रविवारी सकाळपासूनच ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेल्या. सणापूर्वीचा शेवटचा रविवार असल्याने खरेदीसाठी अक्षरश: झुंबड उडाली. मोतीचौक, राजवाडा, देवी चौक, राजपथ, खणआळी, पोवईनाका परिसरात वाहतुकीची कोंडी होत होती.

दिवाळीचा प्रारंभ शुक्रवार दि. 21 रोजी वसूबारसपासून होत आहे. शनिवार दि. 22 रोजी धनत्रयोदशी, सोमवार दि. 24 रोजी नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन आहे. बुधवार दि. 25 रोजी पाडवा व भाऊबीज आहे. त्यामुळे बाजारात दिवाळी खरेदीची लगबग सुरू झाली आहे. रविवार सुट्टी असल्याने सातारा शहरासह उपनगरातील नागरिकांनी सहकुटुंब खणआळी, मोती चौक, राजपथ, देवी चौक, सोमवार पेठ, पोवईनाका, बसस्थानक परिसरासह अन्य ठिकाणी खरेदीसाठी गर्दी केली होती. खरेदीसाठी गर्दी झाल्याने बाजारपेठेत उत्साह जाणवत होता.

शहर व परिसरात आकाशकंदिल, सजावट साहित्य, केरसुणी, रांगोळी, रंगी बेरंगी पणत्या, फटाके, कपडे यासह अन्य साहित्य खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. मोबईल, एलईडी टिव्ही, फ्रीज, वाशिंग मशिन, सोन्या चांदीची दुकानेही नागरिकांच्या गर्दीने गजबजून गेली होती. रात्री उशिरापर्यंत बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होती. त्यामुळे दिवसभरात सातारा शहर परिसरातील बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल झाली. बाजारपेठेत गर्दीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Back to top button