किल्ले प्रतापगड ३६३ मशालींनी उजळला | पुढारी

किल्ले प्रतापगड ३६३ मशालींनी उजळला

प्रतापगड, पुढारी वृत्तसेवा : ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला किल्ले प्रतापगड गुरुवारी रात्री 363 मशालींनी उजळून निघाला. यावेळी नयनरम्य आतषबाजी करण्यात आली. तसेच ढोल-ताशा पथकाचा गजर आणि घोषणांनी अवघा प्रतापगड दुमदुमला.

हा सोहळा पाहण्यासाठी राजमाता श्री. छत्रपती कल्पनाराजे भोसले याही गडावर दाखल झाल्या होत्या. हजारो शिवभक्त गडावर दाखल झाले होते. प्रतापगडावरील भवानी मातेच्या प्रतिष्ठापनेला नवरात्रौत्सवातील चतुर्थीला 359 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त या मशाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सन 2010 पासून ही परंपरा सुरू असून यंदा या महोत्सवाचे 13 वे वर्ष आहे.

छ. शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी केलेले पराक्रम या किल्ल्याशी जोडलेले आहेत. त्यांच्याच आदेशाने पानसरे म्हणजे गडाचे किल्लेदार हवालदार यांनी नेपाळच्या गंडकी नदी मधील शाळीग्रामपासून भवानी मातेची मूर्ती बनवून प्रतापगडावर देवीची प्रतिष्ठापना केली. या घटनेला 359 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले यांच्या संकल्पनेतून व चंद्रकांत उत्तेकर यांच्या मार्गदर्शनाखाली 363 मशाली पेटवण्याची परंपरा सुरू झाली.

चतुर्थी दिवशी भवानी मातेची विधिवत पूजा व गोंधळ झाल्यानंतर रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘छ. शिवाजी महाराज की जय’ या जयघोषात 363 मशाली प्रज्वलित करण्यात आल्या. या मशालींमुळे अवघा प्रतापगड उजळून निघाला.

प्रतापगडावरील मंदिर परिसर व मुख्य द्वारावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. गडावर आलेल्या सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे नियोजन चंद्रकांत उतेकर, किल्लेदार विजय हवालदार, संतोष जाधव, आनंद उतेकर, संदिप राऊत, विलास जाधव आदींनी केले.

Back to top button