सातारा : मातीचे गणपती आता नावापुरतेच | पुढारी

सातारा : मातीचे गणपती आता नावापुरतेच

सातारा;  पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या गणरायाच्या उत्सवाचे स्वरूप बदलत चालले आहे. इको फे्रंडलीचा जागर सुरू असल्यामुळे यावर्षी तरी तुलनेने पर्यावरण पूरक बाप्पा दिसू लागले आहेत. मात्र, या व्यवसायात गणेशमूर्तींच्या घडणावळीत झालेले अनेक बदल स्थानिक मूर्तिकारांच्या मुळावर आले आहेत. मातीचे गणपती बनवण्याचे काम अगदी नावापुरते उरले आहे. त्यामुळे भविष्यकाळात मातीला दैवत्व प्राप्त करून देणार्‍या मूर्तिकारांचे भवितव्य अधांतरी बनले आहे.

ओमकाराचे स्वरूप मूर्तीरूपाने साकारताना जेव्हा एखादा मूर्तिकार मातीवर हात ठेवून डोळे मिटून बसतो, तेव्हा त्या मातीचा म्हणजेच मातेचा चैतन्यदायी स्पर्श अफाट उर्जा लेवून सुंदर मूर्तीमधून साकार होतो. अशी मूर्ती बघताना होणारा आनंद हा पुढील निर्मितीची प्रेरणा देणारा असतो. परंतु आजच्या काळात मातीचे गणपती बनवण्याचे काम अगदी नावापुरते उरले आहे.

कृत्रिम रंग, कृत्रिम माती आणि कृत्रिम कला या सार्‍यामुळे गणेशमूर्ती साकारण्यामागची कला, कौशल्य आणि महत्वाचे म्हणजे श्रद्धा हे सर्व काही लोप पावून फक्‍त व्यवसाय उरला आहे. पी.ओ.पी. मूर्तींना आता बंदी घालण्यात आली आहे. असे असले तरी आतापर्यंत अशा मूर्ती बनवणारे कारखानदार व त्यांचे कर्मचारी जणू कलाकार, शिल्पकार असल्याच्या अविर्भावात वावरत असत तर मातीची मूर्ती करणारे मूर्तिकार मूर्तीची हव्या त्या प्रमाणात विक्री न झाल्याने आर्थिक गर्तेत अडकतात. गणेशोत्सवाच्या काही महिने अगोदर सुरू होणारा हा उद्योग कारखानदारांना पैसे मिळवून देणारा असला तरी प्रत्यक्षात काम करणार्‍यांना मात्र त्यामधून काहीच मिळत नाही. मूर्ती घडवताना त्याची खूप काळजी घ्यावी लागते. नीट हाताळणी करावी लागते. या कारखान्यातील कामगारही रोजंदारीने कामावर ठेवलेले असतात व कारखानदार त्यांचा पुरेपूर उपयोगही करून घेतात. उत्सवाचे स्वरूप आता बदलू लागले आहे. काळाच्या ओघात नवनव्या संकल्पना राबवल्या जात आहेत. त्यामध्ये अनेक पारंपरिक बाबींना छेद बसला आहे. असे असले तरी विघ्नहर्त्यांच्या भक्‍तीचा महिमा कायम आहे. या उत्सवातून विधायकता जोपासली जावून समाजाच्या हितासाठी गणेशोत्सव लाभदायक ठरावा, अशी अपेक्षा व्यक्‍त केली जात आहे.

Back to top button