सातारा : रेल्वे स्थानकात महिला सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर | पुढारी

सातारा : रेल्वे स्थानकात महिला सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर

खेड; अजय कदम :  सातारा रेल्वे स्थानकाच्या आवारात सीसीटीव्ही यंत्रणा आणि स्वतंत्र महिला प्रतीक्षालयाचा अभाव असल्याने महिला प्रवासी वर्गाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. या गंभीर समस्यांसह स्थानकात अनेक अडचणींचा रेल्वे प्रवाशांना सामना करावा लागत आहे.

सातारा शहरापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या सातारा रेल्वे स्थानकातून दररोज सुमारे दोन ते अडीच हजार प्रवासी ये-जा करत असतात. रेल्वे स्थानकात सातार्‍यातील प्रवाशांना ये-जा करण्यासाठी पूर्वी चांगल्या पद्धतीने सुरू असलेली बस वाहतूक 24 तास सुरू असणे आवश्यक असताना सद्या दिवसातून केवळ एक वेळच बस सुरू असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे काही प्रवाशांना रिक्षाने स्थानकात व इच्छित स्थळी जावे लागते. अशा वेळी रेल्वेने जाण्यासाठी जेवढे तिकीट असते त्यापेक्षा जास्त पैसे सातार्‍यातून रेल्वे स्थानकात ये -जा करण्यासाठी रिक्षाला मोजावे लागत आहेत. त्यामुळे बससेवा रेल्वेच्या वेळापत्रकाप्रमाणे नियमित सुरू होणे गरजेचे आहे.

गेल्या काही वर्षांत मुख्य रहदारीच्या मार्गासह अगदी छोट्या छोट्या दुकान, हॉटेल, शासकीय, निमशासकीय कार्यालये, पार्किंग यासह वर्दळीच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा बसवलेली पहायला मिळते. मात्र सातारा रेल्वे स्थानकात ही यंत्रणा बसवली नसल्याने मुख्यतः महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. त्यामुळे महिला असुरक्षित आहेत. स्थानक परिसरात लोकवस्ती व वसाहत कमी आणि शेती जादा आहे. अशा स्थितीत प्रवासी महिला, लहान मुले, वृद्ध प्रवाशांच्या सुरक्षिततेसह रेल्वेच्या मालमत्तेच्या संरक्षणासाठी सीसीटीव्ही यंत्रणा तत्काळ बसवणे गरजेचे आहे.

तसेच महिलांसाठी स्वतंत्र प्रतीक्षालयाचा अभाव आहे. महिलांसाठी सुसज्ज प्रसाधनगृहासह सुसज्ज प्रतीक्षालय उभारणे गरजेचे आहे. रेल्वे स्थानकात सद्या वापरात असलेले प्रसाधनगृह सोयीस्कर राहिलेले नाही.त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे फलाट क्रमांक एकवर उत्तर आणि दक्षिण बाजूला नवीन दोन ते तीन प्रसाधनगृह उभारणे गरजेचे आहे. सद्या रेल्वे स्थानकात एकच ओव्हर ब्रीज असून अचानक रेल्वे फलाट क्रमांक दोन वर घेतल्यास किंवा आल्यास प्रवाशांना फलाट क्रमांक दोन वर जाणे गैरसोयीचे व धोक्याचे ठरत आहे. त्यासाठी फलाट एक व दोनला जोडणारा आणखी एक ओव्हर ब्रीज उभारणे आवश्यक आहे.

पोलिस तक्रारीसाठी जावे लागते मिरजला

सातारा जिल्ह्यातील रेल्वे स्टेशन हद्दीत एखादा गुन्हा घडल्यास सध्या तक्रार व फिर्याद दाखल करण्यासाठी प्रवाशांना सांगली जिल्ह्यातील मिरज रेल्वे स्टेशनला जावे लागत आहे. त्यामुळे अनेक वेळा फसवणूक, नुकसान होऊनही तक्रारी दाखल करण्यात येत नाहीत. त्याचा संबंधितांना नाहक त्रास सहन करावा लागतो. प्रवाशांची ही गैरसोय दूर करण्यासाठी सातारा रेल्वे स्थानकात स्वतंत्र पोलिस अधिकारी नियुक्त करुन पोलिस चौकी सुरू करण्याची गरज आहे.

Back to top button