कोयनेत 112 टीएमसी पाण्याची आवक; वर्षभराची चिंता मिटली | पुढारी

कोयनेत 112 टीएमसी पाण्याची आवक; वर्षभराची चिंता मिटली

पाटणः गणेशचंद्र पिसाळ जून महिन्यात पावसाने पाठ फिरवल्यानंतर कोयना धरण भरणार का ? याबाबत चिंता व्यक्त होत होती. मात्र जुलै आणि नंतर ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस झाल्याने 105 टीएमसी पाणी साठवण क्षमता असणार्‍या कोयना धरणात 112 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. धरणाची संपुष्टात येत चाललेली पाणी साठवण क्षमता, पावसाचा शिल्लक अवधी लक्षात घेत धरणातून विनावापर पाणी सोडण्यात आले अन्यथा कोयना धरण यापूर्वीच पूर्ण क्षमतेने भरले असते.

1 जून ते 31 मे असा या धरणाचा तांत्रिक कालावधी चालतो. गत तांत्रिक वर्षात अभूतपूर्व असा पाणी वापर झाला. राज्यातील कोळसा टंचाईमुळे कोयना जलविद्युत प्रकल्पावर अतिरिक्त भार पडला. त्यातूनच ऐतिहासिक वीज निर्मितीही झाली. वर्षभरात पश्चिम वीज निर्मितीसाठी 67.50 टीएमसी पाणी आरक्षित असते. गतवर्षी अतिरिक्त 15 टीएमसी पाणी वापरास परवानगी मिळाली व तेवढा पाणी वापरही झाला. तुलनात्मक सरासरीपेक्षा सिंचनासाठी कमी पाणी वापर झाल्याने सार्वत्रिक दिलासाही मिळाला होता.

1 जूनपासून सुरू झालेल्या नव्या तांत्रिक वर्षात सुरूवातीला धरणात 21.18 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. मात्र जून महिन्यात पाऊसच नसल्याने अवघ्या 1 टीएमसी पाण्याची आवक झाली. त्याच दरम्यान सिंचन व वीज निर्मितीसाठी पाणी वापर झाल्याने 1 जुलै रोजी धरणात केवळ 13.55 टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले होते. त्यानंतर जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात व ऑगस्टच्या दुसर्‍या आठवड्यात येथे अपेक्षित पाऊस झाल्याने धरणातील पाणी व आगामी काळातील सिंचन व वीज निर्मितीचा प्रश्न निकाली निघाला.

आत्तापर्यंत धरणांतर्गत विभागातील कोयना येथे 3 हजार 765 मिलिमीटर, नवजा 4 हजार 484 मिलिमीटर तर महाबळेश्वर 4 हजार 905 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत किरकोळ कमी पाऊस झाला असला तरी अपेक्षित पाणीसाठा झाल्याने सार्वत्रिक चिंता मिटली आहे. सध्या धरणात 98 टीएमसीहून अधिक पाणीसाठा असून त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा 93 टीएमसीहून अधिक आहे.

महापूर टाळण्यात धरणाचे योगदान…

1 जूनपासून पश्चिमेकडील वीज निर्मितीसाठी 10.47 टीएमसी, सिंचनासाठी 4.26 पूरकाळात 4.56 टीएमसी, विनावापर 15.67 टीएमसी व पायथा वीजगृहातून वीज निर्मिती करून तसेच आपत्कालीन दरवाजातूनही वेळप्रसंगी पाणी सोडण्यात आले होते. तरीही धरणातील सध्याचा शिल्लक 98 टीएमसी शिल्लक पाणीसाठा लक्षात घेता आता धरणात केवळ 6.79 टीएमसी इतकचं पाणी सामावून घेतले जाऊ शकते. आगामी काळातील नियोजनासाठी अद्यापही धरणाच्या पायथा वीजगृहातून प्रतिसेकंद 2 हजार 100 क्युसेक पाणी कोयना नदीत सोडले जात आहे. पावसाचा जोर कमी झाला असल्याने धरणाचे सहा वक्री दरवाजे तीन दिवसापूर्वी बंद करण्यात आले आहेत. पावसाचा जोर वाढल्यास धरणाचे वक्री दरवाजे पुन्हा उचलले जाण्याची शक्यता आहे.

Back to top button