सातारा पालिका साकारणार सौरऊर्जा प्रकल्प | पुढारी

सातारा पालिका साकारणार सौरऊर्जा प्रकल्प

सातारा : पुढारी वृत्‍तसेवा सातारा नगरपालिका प्रशासनाने खर्च कमी करत उत्पन्न वाढवण्यावर भर दिला आहे. सोनगाव कचरा डेपो येथे सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरु केले असून त्यातून सुमारे 1 हजार 555 किलो वॅट वीजनिर्मिती होऊ शकेल. या विजेचा वापर शहापूर पाणी योजना, जकातवाडी जलशुध्दीकरण केंद्र तसेच एफएसटीपी प्‍लांटसाठी केला जाणार आहे. त्यामुळे विजबिलापोटी होणार्‍या लाखो रुपये खर्चाची बचत होणार आहे.

शहरात सोडियम वापराऐवजी एलईडी दिव्यांचा वापर करुन नगरपालिकेने वीज बिलावर होणारा खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. मालमत्‍ता कराच्या बिलांवर जाहिराती छापणे, सार्वजनिक ठिकाणी जाहिराती लावण्यासाठी निविदा मागवून नगरपालिकेने दरवर्षी लाखोंचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला. मुख्याधिकारी अभिजीत बापट तसेच अतिरिक्‍त मुख्याधिकारी पराग कोडगुले यांच्या मार्गदर्शनाखाली खर्च कमी करणारे आणि उत्पन्न वाढवणारे निर्णय घेतले जात आहेत. केवळ सरकारी अनुदानांवरच विसंबून न राहता उत्पन्नाचे स्रोत तयार करणे, पूर्वीचे स्रोत आणखी बळकट करणे याकडे प्रशासन कसोशिने लक्ष देत आहे. बर्‍याच कामांमध्येही सुधारणा केल्याने त्याचा विकासाच्यादृष्टीने चांगला परिणाम दिसून येत आहे.

प्रशासनाकडून विकासाच्यादृष्टीने नवनवे प्रकल्प साकारले जात आहेत. अभिजित बापट यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका मालकीच्या सोनगाव कचरा प्रक्रिया केंद्राच्या आवारात सौर ऊर्जा प्रकल्प साकारण्यात येणार आहेत. पहिला सौर ऊर्जा प्रकल्प सुमारे 1 हजार 505 किलोवॅट क्षमतेचा असेल. या प्रकल्पातून निर्माण होणार्‍या विजेचा शहापूर पाणी योजना आणि जकातवाडी जलशुध्दीकरण प्रकल्पासाठी वापर केला जाणार आहे. शहापूर योजनेचा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. उरमोडी नदीवर असलेल्या या पाणीयोजनेतून पाणी लिफ्ट करुन जकातवाडी जलशुध्दीकरण केंद्रात आणून ते शहरातील पाणी वितरण टाक्यांना द्यावे लागते.

शहापूर पंपिंग स्टेशन ते जकातवाडीतील जलशुध्दीकरण केंद्र हे अंतर जादा आहेच पण अजिंक्यतारा किल्‍ला परिसर ओलांडून हे पाणी शहरात आणावे लागते. त्यामुळे विजेचा मोठा वापर या योजनेसाठी होतो. परिणामी शहापूर योजनेचे विजबिल मोठ्या प्रमाणावर येते. त्यातच वाढत्या मेंटेनन्सची भर पडते. त्यामुळे शहापूर योजना म्हणजे ‘पांढरा हत्‍ती’ अशी टीकाही केली जाते. आता या योजनेचा खर्च कमी करण्याचा प्रयत्न सौरऊर्जा प्रकल्प उभारुन केला जाणार आहे. त्यामुळे सातारकरांचे लाखो रुपये वाचणार आहेत.

सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून सोनगाव कचरा प्रक्रिया केंद्र येथे साकारण्यात येणार्‍या सौर ऊर्जा प्रकल्पातून वीजनिर्मिती सुरु होईल. या प्रकल्पांमुळे मोठी वीजबचत होणार आहे. एफएसटीपी प्‍लांटसाठी स्वतंत्र सौरऊर्जा प्रकल्प सीएसआर फंडातून केला जाणार आहे. दोन्ही प्रकल्पांमुळे विजेवर होणारा लाखो रुपयांचा खर्च वाचणार आहे.
– अभिजीत बापट
मुख्याधिकारी, सातारा नगरपालिका

एफएसटीपीसाठी स्वतंत्र 50 किलोवॅट वीजनिर्मिती

सातारा नगरपालिकेकडून सोनगाव कचरा प्रक्रिया केंद्रावर एफएसटीपी प्‍लँट उभारला आहे. सीएसआर फंडातून या एफएसटीपीसाठी स्वतंत्र 50 किलो वॅटचा प्रकल्प साकारला जाणार आहे. त्यामुळे येथील वीज बिलात मोठी बचत होणार आहे. सौर ऊर्जा प्रकल्पांची कामे सुरु झाली असून थोड्याच दिवसांत हे प्रकल्प सुरु होतील.

Back to top button