सातार्‍यात सीसीटीव्हींनाही रातांधळेपणा | पुढारी

सातार्‍यात सीसीटीव्हींनाही रातांधळेपणा

सातारा : विठ्ठल हेंद्रे सातारा शहरासह उपनगरात 32 सीसीटीव्हींचा वॉच आहे. मात्र एकाही कॅमेर्‍याचा दर्जा नसल्याने त्याला रातआंधळेपणा आला आहे. नावालाच तिसरा डोळा असल्याने चोरट्यांचा नारा.. चलो सातारा असा बुलंद आहे. यासाठी प्रशासनाने एनपीआर कॅमेर्‍यांचे जाळे विणने गरजेचे बनले आहे.

सातारा शहर जिल्ह्याचे ठिकाण असून शहरात येण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी अनेक रस्ते आहेत. यामध्ये प्रामुख्याने लिंबखिंड, वाढे फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट, अजंठा चौक, शिवराज पेट्रोल पंप, बोगदा, मोळाचा ओढा या परिसराचा समावेश आहे. याशिवाय शहरातील राजवाडा परिसर, मोती चौक, शाहू चौक, संपूर्ण पोवई नाका परिसर, एसटी स्टॅन्ड, गोडोली चौक, शाहूपुरी चौक हे परिसर नेहमी वर्दळीचे असतात. सध्या सातार्‍यात 32 कॅमेर्‍यांचा वॉच असून त्याचा अ‍ॅक्सेस पोलिस मुख्यालय कंट्रोल रुममधील डायल 112 मध्ये आहे. याशिवाय खासगी व्यक्‍ती, संस्था यांचे मर्यादित सीसीटीव्ही देखील आहेत. 32 व खासगी असे शेकडो कॅमेरे आहेत. मात्र यातील अपवादानेच एखाद दुसर्‍या ठिकाणी दर्जेदार कॅमेरे आहेत. बहुतांशी ठिकाणी मात्र सुमार दर्जाचे कॅमेरे आहेत. शहरात येणारे व जाणार्‍या रस्त्यावर तर कॅमेरेच नसून ते सताड ओपन आहेत. यामुळे चोरट्यांचे फावत असून अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांना चोरट्यांपर्यंत पोहचण्यास अडचणी येत आहेत.

एएनपीआर कॅमेरा म्हणजे काय?

अ‍ॅटोमॅटिक नंबर प्लेट रिक्नायझेशन अर्थात कॅमेरा लायसन्स प्लेट कॅप्चर करणारा सीसीटीव्ही. वाहनांना पुढे व पाठीमागे नंबर प्लेट असते. हे एएनपीआर कॅमेरे शहराच्या एंट्री व एक्झीट पॉईंटवर लावल्यास या एनपीआर कॅमेर्‍यामधून कोणतेही वाहन गेले की ते संपूर्ण वाहन व त्याची नंबर प्लेट स्कॅन करते. कितीही अंधार, पाऊस, उन, वारा असला तरी नंबर प्लेट कॅच होतोच. यामुळे हे कॅमेरे बसवले गेले तर गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांना त्याची मोठी मदत मिळण्यास मदत होणार आहे. हा कॅमेरा अधिक महागडा नसून एका कॅमेर्‍याची किंमत साधारण 60 हजार रुपयांपर्यंत आहे.

सातारच्या फुटेजची निघतेय अब्रु

सातारा शहरात कॅमेर्‍यांचे इन्फ्रास्ट्रक्‍चर आहे. मात्र दर्जात्मक कॅमेरे नसल्याने त्याचा फारसा फायदा होत नाही. अगदी दिवसा एखाद्या वाहनाची नंबर प्लेट तपासायचे झाले तरी त्याचा उपयोग होत नाही. अशातच रात्रीच्या एखाद्या गुन्ह्याचे फुटेज तपासयचे झाले तर अबु्रच निघते. शहरात अनेकदा संवेदनशील घटना घडल्या आहेत. मार्च 2022 मध्ये कलेक्टर ऑफिस परिसरातून बेघर समाजातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर पाशवी अत्याचार करण्यात आले. या घटनेत पोलिसांना एकही दर्जाचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले नव्हते हे भीषण वास्तव आहे. संशयित आरोपीची दुचाकीची लाईटची एक लाईट ब्लिंक होत असल्याने त्यावरुन पोलिसांनी संशयिताला आठ दिवसांनी बेड्या ठोकल्या.

विटा, आटपाडी, इस्लामपुरात क्‍वॉलिटी सीसीटीव्ही

सातारा जिल्ह्यानजीक विटा शहर आहे. दोन वर्षापूर्वी याठिकाणी 29 कॅमेरे बसवले गेले आहेत. यामध्ये केवळ 4 एएनपीआर व 20 बुलेट सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले आहेत. विट्यामधील कॅमेर्‍यांच्या या सेटअपचा खर्च साधारण 30 लाख रुपये एवढा आला आहे. आटपाडी शहरात देखील असेच कॅमेरे बसवले गेले आहेत. इस्लामपूर शहरात 120 कॅमेरे आहेत. संपूर्ण शहरात दर्जात्मक कॅमेरे बसवले असून बहुतेक कॅमेरे लोकसहभागातूनही लावले गेले आहेत. या 3 शहरांमध्ये क्‍वालिटी कॅमेरे बसवले गेल्याने चोर्‍यांचे प्रमाणच कमी झाले आहे.

डीपीडीसीचा निधी किंवा लोकसहभागाचा पर्याय

सातारा शहर छोटे असल्याने चांगल्या दर्जाचे सीसीटीव्ही बसवण्यासाठी फारसा खर्च येणार नाही. त्यासाठी 50 लाख ते 1 कोटी रुपया पर्यंतचा निधी उभारला गेला तरी सातारा सुरक्षित राहण्यासाठी पुरेसा आहे. यासाठी जिल्हा नियोजन अर्थात डीपीडीसी पर्याय असून लोकप्रतिनिधींनी त्यासाठी सकारात्कपणे तरतुद करण्याची गरज आहे. याशिवाय लोकसहभागातून देखील चांगले सीसीटीव्ही उभे राहिले जावू शकतात.

Back to top button