सातारा : आ. शिवेंद्रराजेंच्या रॅलीने स्वातंत्र्यदिनाचा माहोल | पुढारी

सातारा : आ. शिवेंद्रराजेंच्या रॅलीने स्वातंत्र्यदिनाचा माहोल

सातारा; पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सातारा शहरातून भव्य तिरंगा दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीला सातारकरांनी उदंड प्रतिसाद दिला. हजारो दुचाकीस्वार या रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी देशभक्तीपर घोषणांनी रॅली मार्ग दणाणून गेला.

राजवाडा येथील गांधी मैदान येथून या दुचाकी रॅलीला प्रारंभ झाला. यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. रॅली मोती चौक, सदाशिव पेठ, पोलिस मुख्यालयामार्गे पोवईनाका येथील शिवतीर्थावर आली. पोवईनाक्यावर छत्रपती शिवाजी महाराज, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच आ. शिवेंद्रराजे यांनी आकाशात तिरंगी फुगेही सोडले. त्यानंतर ही रॅली पोवईनाका, सिव्हिल हॉस्पिटल, सदरबझार, जि. प. चौक, पोवईनाका मार्गे राजवाड्याकडे मार्गस्थ झाली. रॅलीत ‘भारत माता की जय, वंदे मातरम, जय भवानी जय शिवाजी’ अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला. रॅलीत प्रत्येकाच्या हातात तिरंगा ध्वज, भगव्या टोप्या नागरिकांनी परिधान केल्या होत्या.त्यामुळे स्वातंत्र्य दिनाचा माहोल पूर्वसंध्येलाच पहावयास मिळाला. या रॅलीत आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह विविध सहकारी संस्था, खाजगी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आ. शिवेंद्रराजेप्रेमी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

देशप्रेम आणि देशाभिमान प्रत्येकाच्या तन आणि मनात भरलेला आहेच पण, ‘हर घर तिरंगा’ या अभियानाला क्रांतिकारकांच्या ऐतिहासिक सातारा शहरात भरभरून प्रतिसाद मिळाला.

Back to top button