सातारा : ‘चारसो चालीस व्होल्ट है, छुना है मना!’ | पुढारी

सातारा : ‘चारसो चालीस व्होल्ट है, छुना है मना!’

सातारा ; संजीव कदम : पावसाळ्यात शॉक लागून मृत्यू होण्याचे प्रमाण जिल्ह्यात वाढले असून, फलटण तालुक्यात मध्यंतरी राजाळेच्या घडलेल्या दुर्घटनेने त्याचा प्रत्यय आला. 440 व्होल्टचा जीवघेणा शॉक मृत्यूच्या दाढेत नेत आहे. पावसामुळे निर्माण होणारा ओलावा, नागरिकांचा निष्काळजीपणा व वीज मंडळाचा जीवघेणा कारभार अशा दुर्घटनांना कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे नागरिकांनीही आपला जीव वाचवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे. पावसाळ्यात शॉक लागण्याचा अधिक धोका का असतो?, काय काळजी घेतली पाहिजे?, कोणत्या उपाययोजना राबवल्या पाहिजेत हे समजून घेण्याची गरज आहे. तरच शॉक लागण्याच्या घटना टळतील अन् जीवही वाचतील.

गुंतागुंत समजून घ्या

* पावसाळ्यात वीज खंडित होण्याचे व शॉक लागण्याचे प्रकार सतत घडतात. परंतु, वीज का गेली, का जाते, शॉक का व कसा लागतो? या प्रश्नांची उत्तरे कोणीही शोधत नाही. प्रत्येकवेळी यंत्रणाच दोषी असते, असे नाही. याबाबतीतील गुंतागुंतही समजून घेऊन दुर्घटना टाळणेही महत्त्वाचे असते.

जिल्ह्यात दुर्घटना वाढू लागल्या

* पावसाळा सुरू होण्यापूर्वीच्या वळीव पावसात जशा जीवघेण्या घटना घडतात तशाच पावसाळा सुरू झाल्यावरही शॉक लागून मृत्यू पावल्याच्या घटना वाढत आहेत. फलटण तालुक्यातील राजाळे येथील रुक्मिणी उत्तम दोंदे या महिलेचा पाणी भरण्यासाठी मोटर सुरु करताना शॉक लागून मृत्यू झाला होता. मध्यंतरी घडलेल्या या घटनेने कुटुंबीय हादरुन गेले. त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. यंदाच्या पावसाळ्यात अशाच काही दुर्घटना जिल्ह्यात घडल्या आहेत.

वीज प्रवाह खांबातून जमिनीत कसा उतरतो…

खांबात वीज उतरू नये यासाठी चिनीमातीचे इन्सुलेटर बसविले जातात. हे इन्सुलेटर उन्हामुळे किंवा वीजप्रवाहामुळे गरम होतात. पावसाचे थेंब पडले की, त्याला तडे जातात. ज्यामुळे वीजप्रवाह खांबातून जमिनीत उतरतो. यामुळे आपत्कालीन यंत्रणा (ब्रेकर) कार्यान्वित होऊन फिडर (वीज वाहिनी) बंद पडतो. असे झाले तर शॉक बसण्याचा धोका नसतो.

विद्युत उपकरणांचा पाण्यापासून करा बचाव…

* पाणी हे विजेचे वाहक असल्याने पावसाळयात विद्युत उपकरणांचा पाण्यापासून बचाव करणे आवश्यक असते. त्यामुळे विद्युत अपघात टाळण्यासाठी खबरदारी घेणे व सतर्क राहणे अतिशय आवश्यक आहे. मुसळधार पाऊस व जोराचा वारा यामुळे झाडे व फांद्या वीजतारांवर पडतात. यामध्ये वीजखांब वाकतात. वीजतारा तुटतात. लोंबकळत राहतात. अशा वीजतारांमध्ये वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने त्यापासून सावध राहावे. या वीजतारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये.

तुकड्या-तुकड्यात वायर जोडू नका

लोखंडी पत्र्याच्या घरात राहणार्‍या नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. वायरची जोडणी करताना एकच वायर तुकड्या-तुकड्यात जोडू नये. तसेच वायरची जोडणी करावीच लागली तर त्यावर इन्सुलेशन टेप लावावी.

फिडर बंद पडला नाही तर धोका…

* वीजप्रवाह खांबातून जमिनीत उतरतो तेव्हा जर फिडर बंद पडला नाहीतर जीवित अथवा वित्त हानी होते. जेव्हा वीजपुरवठा अचानक खंडित होतो, त्यावेळी कर्मचारी जवळच्या उपकेंद्राशी संपर्क साधून त्यांच्याकडे वीजपुरवठा आहे की नाही याची खात्री करतात. वीजपुरवठा असल्याची खातरजमा झाल्यानंतर फिडर चालू केला जातो.

तार बांधून कपडे वाळत घालू नका

* विद्युत खांबांना व तणाव तारेला (स्टेवायर) जनावरे बांधू नयेत. त्यास दुचाकी टेकवून ठेऊ नयेत किंवा विद्युत खांबांना तार बांधून कपडे वाळत
घालू नयेत. कपडे वाळवण्यासाठी लोखंडी तारांचा वापर टाळावा. अनावधानाने ही तार वीजप्रवाह असलेल्या तारांच्या संपर्कात आली तर अपघात होऊ शकतो.
* सर्वात आधी वादळामुळे तुटलेल्या वीज तारा, वीज खांब, रस्त्याच्या बाजूचे फिडर पिलर, रोहित्राचे लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स, घरातील विद्युत उपकरणे, शेती पंपाचा स्वीच बोर्ड अशा गोष्टी तपासून पहा. कुठे काही समस्या आढळल्यास ताबडतोप दुरुस्त करून घ्या.
* पावसापूर्वीच घरातील वीज पुरवठ्याला आवश्यक अर्थिंग करून घ्या. घरात शॉर्टसर्कीट झाल्यास ताबडतोब मेन स्वीचवरून वीज पुरवठा बंद करावा.
* घरातील स्वीच, वायर, तारा यांना ओलावा लागणार नाही याची काळजी घ्या. वीज तपासून पाहण्याकरिता आपल्या हातांचा केव्हाही उपयोग करू नये. त्यासाठी टेस्टर सारखे उपकरण वापरावे.
* घरातील दूरचित्रवाणीची डिश किंवा अ‍ॅण्टेना वीजतारांपासून सुरक्षित अंतरावर असावेत. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीचबोर्ड
किंवा घरातील कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी.

शॉक लागू नये म्हणून अशी घ्या काळजी...

* आपल्या घरात एङउइ डुळींलह असणे गरजेचे आहे, जेणेकरून घरातील यंत्रणेत बिघाड झाला तर वीजपुरवठा बंद होऊन जीवितहानी टाळता येईल.
* अर्थिंग सुस्थितीत असली पाहिजे. गरजेनुसार तपासणी करावी.
* उपकरणे किंवा वायरिंग ओलावा व पत्र्यापासून सुरक्षित असावा.
* उपकरणे हाताळताना पायात स्लिपर घालावी.
* बिघाड नेमका कोठे झाला याची माहिती असल्यास कंपनीला संपर्क करावा. जेणेकरुन तातडीने दुरूस्ती करुन वीजपुरवठा सुरळीत होईल.
* तारा तुटल्यास त्याला हात लावू नये.

Back to top button