डॉ. दाभोलकरांच्याच जिल्ह्यात अंधश्रद्धेला खतपाणी | पुढारी

डॉ. दाभोलकरांच्याच जिल्ह्यात अंधश्रद्धेला खतपाणी

सातारा ; मीना शिंदे : जादूटोना विरोधी कायद्याची अंमलबजावणी सुरू असतानाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भोंदूगिरी सुरु आहे. त्यातूनच निष्पाप जीवांचा बळी जात आहे. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी बलिदान दिलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्याच जिल्ह्यात आजही अंधश्रद्धेला खतपाणी मिळत असल्याचे वास्तव पाटण तालुक्यातील नरबळीच्या घटनेने समोर आले आहे.

करपेवाडी, ता. पाटण येथील महाविद्यालयीन युवती भाग्यश्री मानेचा खून झाला होता. भाग्यश्रीचा खून म्हणजे नरबळीचा प्रकार असल्याचे समोर आल्याने समाजमन सुन्न झाले आहे. गुप्तधन प्राप्ती, गृहशांतीसाठी देवर्षी व मांत्रिकाच्या मदतीने हा खून केला आहे. अशा अनेक घटना आजही जिल्ह्यासह राज्यात घडत आहेत. मागच्याच महिन्यात अंधश्रध्देतूनच सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथील एकाच कुटुंबातील नऊ जणांचे बळी गेले आहेत. या दोन्ही घटनांमधील मांत्रिकांची सांगड असल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे.

पैशांचा पाऊस पाडणे, गुप्तधन प्राप्ती आदि आमिषांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भोंदूबाबांकडून नागरिकांची फसवणूक होत असून भाग्यश्रीसारख्या निष्पापांचे बळी जात आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जनक डॉ. नरेंद्र दाभोळकर हे सातारा जिल्ह्यातील आहेत. त्यांनी आपले सर्व आयुष्य अंधश्रध्दा निर्मूलनाच्या कार्याला वाहून घेतले. जादूटोणा विरोधी कायदा संमत करण्यासाठी व त्याच्या अंमलबजावणीसाठी डॉ. दाभोळकरांसह अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आपले आयुष्य झिजवले.

डॉ.नरेंद्र दाभोळकरांची हत्या हाही त्याचाच एक भाग होता. डॉ. दाभोळकरांच्या प्रयत्नांना यश आल्याने जादूटोना विरोधी कायदा संमत होऊन सध्या त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. असे असताना जिल्ह्यात नरबळीची घटना उघड झाल्याने डॉ. दाभोळकरांच्याच जिल्ह्यात अंधश्रध्देला खतपाणी मिळत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. फसवेगिरी करणार्‍या भोंदूबाबांच्या टोळ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.

अज्ञान व आर्थिक विवंचनेतूनच अंधश्रद्धेचा फास

शिक्षणाचा अभाव आणि कर्जबाजारी लोकच या भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकत आहेत. ग्रामीण भागात देवाचा कोप समजून अनेक महिला जटांचे ओझे वर्षानुवर्षे वागवत आहेत. जट काढण्यास देवर्षींकडून भीती दाखवली जाते. परिस्थितीमुळे कोलमडलेले तसेच भाबडे लोक भोंदूंवर विश्वास ठेवत असल्याने अंधश्रद्धेचा फास आणखी आवळत आहे.

Back to top button