सातारा : जीव धोक्यात घालून वर्षभर दळणवळण | पुढारी

सातारा : जीव धोक्यात घालून वर्षभर दळणवळण

ढेबेवाडी; पुढारी वृत्तसेवा : मागील वर्षीच्या अतिवृष्टीने सर्वत्र हाहाकार उडाला होता. गावोगावचे रस्ते उद्ध्वस्त झाले होते. पायपूल, मोर्‍या, फरशी पूल उद्ध्वस्त झाले होते. पिके जमिनींसह वाहून उद्ध्वस्त होऊन मोठी हानी झाली होती. दळणवळण विस्कळीत झाले होते आणि त्याच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपये मंजूर झाल्याचे सांगण्यात आले होते. पण, दुरुस्त्या आजअखेर झालेल्या नाहीत. शेतीची नुकसान भरपाई मिळाली, पण दुरुस्तीने कुठे पेंड खाल्ली? तो मंजूर झालेला निधी गेला कुठे? हे आजही स्थानिकांना समजत नाही.

भालेकरवाडी (बनपुरी) येथील वांग नदीवरील पूल उद्ध्वस्त होऊन वाहून गेला होता. पण आजअखेर त्याची साधी दुरुस्तीही झालेली नाही. त्यामुळे यंदा अतिवृष्टी होऊन महापूर आल्यास काय होणार? यासारखे प्रश्‍न अजून अनुत्तरीत आहेत. सणबूर मार्गे रूवले ते पुढे वाल्मिकी पठारावर जाणार्‍या मार्गावरील रस्ता सणबूर येथे पुलासह खचला असून हा मार्ग धोकादायक बनला आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. पण वर्ष उलटून गेले तरी सुद्धा दुरुस्ती झाली नाही. मग बांधकाम खाते किंवा सार्वजनिक बांधकाम असो वा जिल्हा परिषदेचा बांधकाम विभागाबाबत संतप्‍त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तसेच प्रशासन रस्ता तुटायची वाट पहात आहे की काय? असा प्रश्‍नही निर्माण झाला आहे.

ढेबेवाडी विभागात अतिवृष्टी वारंवार होते, असा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे यंदा अतिवृष्टी होऊन महापूर आल्यास मागील वर्षी नुकसान झालेल्या रस्त्यासह पुलाला तडाखा सहन होण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळेच या मार्गावरील दळणवळण पूर्णपणे ठप्प होणार आहे. वर्षभरात शासनासह प्रशासनाने दुरुस्तीकडे कानाडोळा केल्याने एखादा अनुचित प्रकार घडू शकतो. त्यामुळेच निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर त्यास कोण जबाबदार? असा प्रश्‍नही उपस्थित होत आहे. तसेच स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पहावयास मिळत आहे.

Back to top button