कराड : सत्तेत येणार्‍या पार्टीचाच नगराध्यक्ष असणे गरजेचे | पुढारी

कराड : सत्तेत येणार्‍या पार्टीचाच नगराध्यक्ष असणे गरजेचे

कराड ; प्रतिभा राजे : गतवेळप्रमाणेच पुन्हा एकदा नगराध्यक्ष निवड ही जनतेतून होणार असल्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी इच्छूक असणार्‍यांमध्ये खुशी निर्माण झाली आहे. मात्र नगराध्यक्ष पदाचे आरक्षण काय असेल याबाबतही प्रतिक्षा आहे. जनतेतून नगराध्यक्ष निवड होणार्‍या नगराध्यक्षांना जर बहुमत नसेल तर विकासकामांमध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे नगराध्यक्ष निवड जनतेतूनच असली तरी सत्तेवर येणार्‍या पार्टीचाच नगराध्यक्ष असावा असे मत राजकीय तज्ञ तसेच जनतेतून व्यक्त होत आहे. थेट नगराध्यक्ष निवडीमुळे बहुमत नसेल तर कारभार न होता केवळ राजकारण होते असेही मत व्यक्त होत आहे.

सत्ता बदल झाला की आधीचे निर्णय बदलले जातात. त्याप्रमाणेच पूर्वीप्रमाणे नगराध्यक्ष निवड जनतेतून करण्यात येणार असल्याचा निर्णय शिंदे – भाजप सरकारने घेतला आहे. त्यानुसार कराडमध्ये या पदासाठी इच्छूक असणार्‍यांमध्ये खुशी निर्माण झाली आहे. मात्र नगराध्यक्ष एका पार्टीचा बहुमत दुसर्‍या पार्टीला असेल तर नगराध्यक्षांना काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. नगराध्यक्षांना सर्व अधिकार असले तरीही निर्णय घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

सत्ताधार्‍यांकडून कुरघोड्यांचे राजकारणही होवू शकते. जर नगराध्यक्ष सत्ताधारी पार्टीचाच असेल तर त्याला काम करतांना इतर सदस्यांचे सहकार्य केले जाते. निर्णय एकमताने होतात. अविश्वासाचा ठराव मांडण्याची वेळ येत नाही असे मत इच्छूक उमेदवारांकडून तसेच जनतेतून व्यक्त होत आहे.

गतवेळी नगराध्यक्ष निवडीचा निर्णय कराडसाठी योग्य ठरला नाही. नगराध्यक्ष एका पार्टीचा आणि बहुमत दुसर्‍या पार्टीला असे असल्यामुळेकराडमध्ये ‘तीन तिघाड काम बिघाड’ असा प्रकार झाला होता. त्यामुळे ज्या पार्टीचे बहुमत त्याच पार्टीचा नगराध्यक्ष असावा असा सूरही निर्माण होत आहे. गतवेळी नगराध्यक्षा भाजपाच्या आणि सत्तेत जनशक्ती आघाडी यामुळे अनेक निर्णय घेताना अडचणी निर्माण झाल्या.

अनेक निर्णय पेंडिंग पडले त्यामुळे विकासकामांमध्ये अनेकदा बाधा येत गेल्या. अनेक निर्णय मागे ठेवण्यात आल्यामुळे शहराचे नुकसान झाले. नगराध्यक्षांना कारभार करताना दरवेळी व सत्ताधिकार्‍यांना सामावून घेताना, त्यांच्याशी जमवून घेताना अडचणी निर्माण झाल्या. अशीच परिस्थिती केवळ कराडमध्येच नव्हे तर ज्या ठिकाणी सत्ता एका गटाची व नगराध्यक्ष दुसर्‍या पक्षाचा अशी परिस्थिती असेलव त्याठिकाणी पाच वर्षे उणीदुणी काढण्यात गेल्यामुळे विकासकामे खुंटली आहेत.

कराडमध्ये तर पाच वर्षात केवळ खेळखंडोबा झाला. नगराध्यक्ष या पदाला महत्व राहिले नाही. नगराध्यक्षांना कोंडीत पकडणे असा प्रकारही अनेकदा झाला. त्यामुळेच ज्यांची सत्ता त्यांचाच नगराध्यक्ष या पध्दतीने पालिकेचा कारभार चांगला चालला जाईल व शहराचा विकासही होईल असा मतप्रवाह निर्माण झाला आहे.

Back to top button