सातारा : काय तो पाऊस… काय ते धबधबे… काय तो निसर्ग… पाटणला पर्यटनासाठी सगळं ओक्के! (Photos) | पुढारी

सातारा : काय तो पाऊस... काय ते धबधबे... काय तो निसर्ग... पाटणला पर्यटनासाठी सगळं ओक्के! (Photos)

पाटण; गणेशचंद्र पिसाळ : मागील वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी, भूस्खलन, ढगफुटी, महापूर यामुळे कोयनेच्या निसर्गाला ग्रहण लागले होते. मात्र, ‘मोडली जरी पाठ तरी मोडला नाही कणा, पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा’ या उक्तीप्रमाणे कोयनेच्या निसर्ग सानिध्यात काय तो पाऊस.. काय ते धबधबे.. काय तो निसर्ग.. पर्यटनासाठी सगळे ओक्के.. असे शब्द आपोआपच मुखातून बाहेर पडताहेत. निसर्ग नव्याने फुलू लागला आहे. त्याचवेळी या निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी आता पर्यटकांची पावले कोयना विभागाकडे वळू लागली आहेत. कोयनेसह पाटण तालुक्यातील छोटे – मोठे धबधबे, अन्य पर्यटन केंद्रे पर्यटकांनी बहरू लागली आहेत. याशिवाय येथे कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही, फुकटचा ऑक्सिजनसह मनमुराद मुक्तपणे आपण या निसर्गाचा आनंद घेऊ शकतो. पावसामुळे या नयनरम्य निसर्गाकडे आपोआपच पर्यटकांची पावले पडायला लागली आहेत.

हुंबरळी धबधबा

हुंबरळी धबधबा

सध्या पाटणच्या अनेक पर्यटन केंद्रावर नानाविध नैसर्गिक आविष्कार पाहायला मिळत आहेत. कोयनेचे धरण असो ओझर्डेसह अन्य छोटे-मोठे वाहणारे शेकडो धबधबे, नेहरू उद्यान, पॅगोडा, सडावाघापूर उलटा धबधबा, काठीचे धरण जलाशयातील आयलँड आदी नवनवीन व पारंपारिक पर्यटन केंद्रे आता पर्यटकांसाठी सज्ज आहेत. आशिया खंडातील पवन ऊर्जेचे सर्वोत्तम ठिकाण ठरलेल्या पवन ऊर्जा प्रकल्पाला या हंगामात वेगळेच रुपडे निर्माण होते. ते रुपडे पाहण्यासाठी, त्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी सध्या येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत आहेत.

गाढवराई धबधबा, कामरगांव

गाढवराई धबधबा, कामरगांव

गतवर्षी अतिवृष्टी, भूस्खलनामुळे तालुक्यातील निसर्गासह पर्यटनाचे व वैयक्तिक, सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. येथे पाचवीलाच पुजलेल्या नैसर्गिक आपत्तीला मात देत आजवर प्रत्येक वर्षी प्रत्येक जण नव्या जोमाने पुन्हा त्याच ताकदीने उभा राहिला हा इतिहास आणि परंपराही आहे. ही परंपरा पुन्हा पाहायला मिळत आहे. यातूनच पुणे, सातारा, सांगली, रत्नागिरी, कोल्हापूर, मुंबई यासह राज्याच्या कानाकोपर्‍यातील पर्यटकांची पावले आता कोयना विभागासह पाटण तालुक्याकडे वळू लागली आहेत.

ओझर्डे धबधबा

ओझर्डे धबधबा

यातूनच मग अगदी चहा, वडापाव, भजीच्या टपरी, छोटी-मोठी हॉटेल्स, रिसॉर्ट आणि पर्यटन केंद्रे ही आता बहरू लागली आहेत. निश्चितच कोयनेचे हे नैसर्गिक चित्र पुन्हा नव्याने उभारताना सार्वत्रिक समाधान मिळत आहे. त्याचवेळी या कोलमडलेल्या नैसर्गिक व स्थानिक परिस्थितीला हातभार लावण्यासाठीही आता येथे अधिकाधिक पर्यटक यावेत व स्थानिक पर्यटन केंद्रे फुलून जावीत. जेणेकरून स्थानिक रोजगार, व्यवसायालाही यातून मदत व प्रोत्साहन, बळकटी मिळेल अशा प्रतिक्रियाही स्थानिकांमधून उमटत आहेत.

कोंडावळे धबधबा

कोंडावळे धबधबा

शिंदे सरकार तरी बोटिंग सुरू करणार का …?

कोयना पर्यटनासाठी केंद्रबिंदू ठरलेल्या शिवसागर जलाशयातील बोटिंग गेल्या काही वर्षात बंद पडले आहे. राज्यात अगदी आघाडी, युती, महाविकास आघाडीची सरकारे आली, पण अद्यापही हे बोटिंग सुरू झालेले नाही. निदान आता कोयना काठचे सुपूत्र एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्याने कोयनेचे बोटिंग सुरू होण्याच्या अपेक्षा आहेत. बोटिंगमुळे निश्चितच येथे पर्यटकांचा लोंढा वाढेल. त्यातूनच स्थानिकांचा रोजगार, व्यवसाय, उद्योगाचाही मार्ग मोकळा होईल. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन, राज्य शासनाने याचा तातडीने व गांभीर्याने विचार करून हे बोटिंग सुरू केले तर निश्चितच ते सार्वत्रिक हिताचे ठरणार आहे.

पर्यटन वाढीसाठी भरीव निधीची गरज…

भूस्खलनामुळे मागील वर्षी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प तसेच वनविभागाकडून कोयनानगर विभागात पर्यटकांसाठी करण्यात आलेल्या सुविधा अक्षरशः उध्वस्त झाल्या आहेत. या विभागातील मार्गाच्या मजबुतीकरणासाठी निधीची गरज आहे. तसेच ओझर्डे धबधबा परिसरात तर उद्घाटन होण्यापूर्वीच भूस्खलनामुळे होत्याचे नव्हते झाले होते. त्यामुळेच आता पुन्हा एकदा ओझर्डेसह या विभागातील पर्यटनाला पूर्वीचे दिवस येण्यासाठी राज्य शासनाकडून भरीव निधीची आवश्यकता आहे.

हुंबरळी धबधबा

Back to top button