सातारा : जिल्ह्यात 70 टक्के पीक कर्ज वाटप | पुढारी

सातारा : जिल्ह्यात 70 टक्के पीक कर्ज वाटप

सातारा : महेंद्र खंदारे जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंता होती. परंतु, जुलैमध्ये पावसाने आगमन झाल्याने शेतकरी आता पेरते झाले आहे. त्यामुळे बियांणांपासून ते खतापर्यंत सर्व गोष्टींसाठी पीक कर्जाचा आधार घेतला जात आहे. खरीप हंगाम सुरू झाला असून जिल्ह्यातील 35 बँकांनी 1299 कोटी कर्जाचे वाटप केले आहे. यामध्ये सातारा जिल्हा बँकेने सर्वाधिक कर्ज वाटप केले आहे. जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या उद्दिष्टापैकी 70 टक्के कर्ज वाटप झाले आहे.

जून महिन्याच्या मध्यावर खरीप हंगामाला सुरूवात होते. जुलै महिन्यात पावसाला सुरूवात झाल्याने शेतकरी आता पेरणीत व्यस्त झाले आहेत. पिकांच्या लागवडीपासून ते तोडणीपर्यंत येणारा खर्च उभा करण्यासाठी शेतकरी विविध बँकांकडून कर्ज घेतात. राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांमध्ये 6 टक्के व्याजदराने हे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. तर जिल्हा बँकेमध्ये हेच कर्ज चक्‍क 0 टक्के व्याजदाराने दिले जाते. आता खरीप हंगाम सुरू होऊन महिन्याभराचा कालावधी लोटल्यानंतर पिक कर्जवाटपामध्ये राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांची कामगिरी खालावली गेली आहे.

यंदाच्या खरीप हंगामात जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली ठरवण्यात आलेल्या आरखड्यानुसार 1 हजार 850 कोटींचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट डीसीसी बँकेसह खासगी व राष्ट्रीयीकृत बँकांना देण्यात आले आहे. यामध्ये आतापर्यंत 1 लाख 39 हजार 389 शेतकर्‍यांना 799 कोटी 76 लाख रूपयांचे कर्ज वाटप झाले आहे. यामध्ये सातारा जिल्हा बँकेने 2 लाख 8 हजार 292 शेतकर्‍यांना 1177 कोटी 35 लाख तर राष्ट्रीयीकृत बँकांनी 7 हजार 911 शेतकर्‍यांना 122 कोटी 40 लाख रूपयांच्या पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. जिल्हा बँकेने उद्दिष्टाच्या 98 तर राष्ट्रीयीकृत बँकांनी अवघे 19 टक्के कर्ज वाटप केले आहे.

एकीकडे राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांनी पिक कर्ज देण्यात हात आखडता घेतल्याने जिल्हा बँकेने वडीलधार्‍याची भूमिका पार पाडली आहे. शेतकर्‍यांच्या हितासाठी जिल्हा बँकेने आपल्या उद्दिष्टापेक्षा जास्त पिक कर्जाचे वाटप केले आहे. जिल्हा बँकेला हंगामासाठी तब्बल 1190 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. खरीपासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत कर्ज देण्याची मुभा आहे. असे असतानाही कर्जासाठी शेतकर्‍यांना दारोदार भटकावे लागत आहे. राष्ट्रीयीकृत व खासगी बँका शेतकर्‍यांना कर्जासाठी उभे करत नसल्याने या बँकांकडून जबरदस्तीने कर्ज वाटप करण्यासाठी पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. राष्ट्रीयीकृत बँकांनी हात आखडता घेतल्याने फक्‍त 43 टक्के कर्जवाटप केले आहे. जिल्हा बँकेने आपली जबाबदारी चोख पार पाडल्याने अतिरिक्‍त उद्दिष्ट देऊन बँकेचे कंबरडे मोडण्याचे काम केले जात आहे.

कर्ज वाटपावर पेरण्यांचाही परिणाम

यंदा अख्खा जून महिना कोरडा गेला आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पाऊस नसल्यानेे जुलै महिना उजाडला तरी केवळ 4 टक्केच पेरण्या झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दोन दिवसांपासून सातार्‍यासह परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, अपेक्षित पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहे. त्यामुळे शेतकरी पीक कर्ज लवकर घेत नसल्याची परिस्थिती आहे. पुढील काही दिवसांमध्ये चांगला पाऊस झाल्यास पीक कर्ज वाटपात आणखी वाढ होईल.

दरवर्षीप्रमाणे यंदाही सातारा जिल्हा बँकेने पीक कर्ज वाटपात आघाडी घेतली आहे. शेतकर्‍यांशी बांधिलकी ठेवून कर्ज वाटप केले जात आहे. बँक यंदाही उद्दिष्टापेक्षा अधिक कर्ज वाटप करेल.
– डॉ. राजेंद्र सरकाळे
मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

Back to top button