सातारा : चोरट्यांचा मोबाईलवर डल्ला | पुढारी

सातारा : चोरट्यांचा मोबाईलवर डल्ला

उंडाळे; पुढारी वृत्तसेवा : गेल्या पाच सहा महिन्यांपासून उंडाळे आठवडी बाजारात होणारी मोबाईल चोरी थांबली होती. मात्र, पुन्हा या बाजारात मोबाईल चोरांनी उच्छाद घातला असून, रविवारी एकाच दिवशी सात ते आठ बाजारकरूंचे भारी किमतीचे मोबाईल अज्ञात चोरट्यांनी बाजारातून लंपास केले आहेत.

याबाबत पोलिसांत तक्रार करूनही पोलिसांकडून कोणतीही पावले उचलली गेली नाहीत.त्यामुळे सर्वसामान्य जनतेतून पोलिस प्रशासनाच्या कामकाज बाबतीत आश्चर्य व्यक्त होत आहे. कोरोनानंतर ग्रामीण भागातील आठवडी बाजार पुन्हा एकदा मोठ्या गर्दीने भरू लागले आहेत. तत्पूर्वी विभागातील आठवडी बाजारात सातत्याने एक-दोन आठवडे खंड पाडून बाजार खरेदी व विक्रीसाठी येणार्‍या ग्राहकांचे मोबाईल चोरी झाल्याच्या तक्रारी आहेत. हमखास चार-पाच मोबाईल लंपास होत होते. याबाबत पोलिसांत तक्रार देऊनही पोलिसांकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. रविवारी झालेल्या आठवडी बाजारांमध्ये विभागातील सहा ते सात लोकांच्या खिशातील मोबाईल चोरट्यांनी लंपास केले आहेत. भारी किमतीचे मोबाईल असल्याने चोरटे आपले काम पूर्ण झाले की तत्काळ तिथून सटकतात. याबाबत काही मोबाईल चोरी झालेल्या ज्यांचे मोबाईल चोरीस गेले त्याने थेट पोलिस स्टेशन गाठून मोबाईल चोरी झाल्याच्या तक्रारी दिल्या; परंतु त्यांनाच पोलिसांनी तुम्ही त्यांना शोधले नाही का ? असा प्रतिप्रश्न केला. उंडाळे बाजारपेठेत विभागातील लोकांची मोठी गर्दी असते याचा फायदा घेऊन अज्ञात चोरटे मोबाईल सह अन्य वस्तू पैसे वर डल्ला मारतात. यासाठी पोलिसांकडून अशा चोरट्यांचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे, अशी मागणी या भागातील जनतेतून होत आहे.

Back to top button