सातारा : राज्यातील राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू सातारा | पुढारी

सातारा : राज्यातील राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू सातारा

सातारा : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्राचे राजकारण हादरवून टाकलेला राजकीय भूकंप घडवून आणणारे ना. एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे गावचे आहेत. त्यांच्या या बंडात राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई व आ. महेश शिंदे सामील असल्याच्या चर्चेने राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू सातारा झाला आहे. अनेक खात्यांचे मंत्रीपद देवूनही ना. शंभूराज देसाई एकनाथ शिंदेंच्या बंडात सामील कसे झाले? असा प्रश्न विचारला जात आहे. याबद्दल राज्यभर आश्चर्य व्यक्त होत आहे.

राज्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवून आणला. ठाणे जिल्ह्यातील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून ते निवडून येत असले तरी ते मुळचे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे या गावचे रहिवासी आहेत. शिक्षणासाठी ते ठाण्यात गेले. वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी शिवसेनेतून राजकीय श्रीगणेशा केला. प्रारंभी तेथे शिवसेना शाखाप्रमुख, ठाणे महापालिकेचे नगरसेवक, सभागृह नेते म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला. त्यानंतर 2004 पासून सलग चार वेळा ते ठाणे जिल्ह्यातील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत आहेत. ते जरी कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून निवडून येत असले तरी दर महिन्याला, कधी कधी दर पंधरा दिवसाला त्यांचा दरे गावात मुक्काम असतो.

महाबळेश्वर व जावली तालुक्यातील जनतेशी त्यांचा अत्यंतिक जिव्हाळा आहे. विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यातील आमदारांची कामे करण्याला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. दरे येथे अनेक राजकीय नेतेमंडळींशी त्यांनी यापुर्वीही अनेकदा गुप्तगू केलेले आहे. राज्यमंत्री शंभूराज देसाई व आ. महेश शिंदे हे त्यांच्या विशेष बैठकीतले मानले जातात. महाराष्ट्रातील अशा आपल्या विश्वासू आमदार व मंत्र्यांना सोबत घेवूनच ना.एकनाथ शिंदे यांनी मोठे बंड केले आहे. सातार्‍यातून त्यांना मिळालेली साथ पाहता राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू सातारा असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे.

कोरेगावच्या आ. महेश शिंदेंचे अचूक टायमिंग

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी अचूक टायमिंग साधले आहे. सातारा जिल्ह्यातील खटावचे महेश शिंदे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील सातारा जिल्हा परिषदेत ते काही काळ सदस्यही होते. मधल्या काळात स्वत:च्या व्यवसायाकडे लक्ष देण्यासाठी महेश शिंदे राजकारणातून बाहेर पडले. मात्र, याच कालावधीत त्यांचा सहवास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांशी आला. त्यातूनच भारतीय जनता पक्षाशी त्यांची जवळीक वाढली. 2019 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी एक वर्ष आधी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदार संघात महेश शिंदे यांनी भाजपचे रान उठवले.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी गावोगावी भाजपचा प्रचार सुरू केला. त्या कालावधीत शिवसेना व भाजप यांची युती होती. जसजशी निवडणूक जवळ येवू लागली तसतशी शिवसेना भाजपच्या जागा वाटपाचे तिढे वाढत गेले. दोन्ही पक्षांच्या अंतर्गत समझोत्यातून कोरेगावची जागा शिवसेनेच्या वाट्याला आली आणि भाजपचा विचार मांडणार्‍या महेश शिंदेंना युतीतून शिवसेनेच्या तिकिटावर लढावे लागले. मात्र, सातारा जिल्ह्याच्या राजकारणात जबरदस्त दबदबा निर्माण करणार्‍या माजी मंत्री शशिकांत शिंदे यांना पराभूत करण्याचा चमत्कार महेश शिंदे यांनी करून दाखवला आणि अचानक त्यांचे नाव राज्याच्या राजकीय पटलावर आले. ते जरी शिवसेनेचे आमदार असले तरी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आ. महेश शिंदे हे अंतर्गत संधान साधून होतेच.

कोरेगाव, खटाव विधानसभा मतदार संघात त्यांच्या अनेक कार्यक्रमांना भाजपच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती असायची. शिवसेनेत नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे विश्वासू समर्थक म्हणूनच ते आत्ता कार्यरत आहेत. ना. एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोरेगाव विधानसभा मतदार संघात कोट्यवधी रूपयांची विकासकामे आणून आ. महेश शिंदे यांनी सातारा जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा निर्माण केला आहे. मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा भाजपमध्ये जावून कमळाच्या चिन्हावर लढणे हेच आ. महेश शिंदे यांचे स्वप्न होते. ना. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे आ. महेश शिंदे यांना आयती संधी मिळाली. त्यांनी अचूक टायमिंग साधले आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडात ते म्होरके झाले आहेत.

मुळातच आ. महेश शिंदे शिवसेनेचे नव्हतेच ते भाजपचेच होते. आ. महेश शिदे यांच्याप्रमाणेच मूळ भाजपमध्ये असलेले काही आमदार शिवसेनेच्या तिकिटावर अ‍ॅडजेस्टमेंट म्हणून त्यावेळी निवडून आले आहेत. असे काही आमदार या बंडात सामील झाल्याचे दिसत आहेत.
आ. महेश शिंदे यांच्या बंडाचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे. आ. महेश शिंदे हे नॉट रिचेबल असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. मात्र, राजकीय उलथापालथीत आ. महेश शिंदे यांनी ना. एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या तोफेला बत्ती दिली असल्याचे दिसत आहे.

मंत्री शंभूराज यांच्याबाबतच्या चर्चेने आश्चर्य

नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या बंडात सामील असलेल्या 22 आमदारांच्या यादीत गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे नाव इलेक्ट्रॉनिक वाहिन्यावरील बातम्यांमधून दिसल्यानंतर संपूर्ण राज्यात आश्चर्य व्यक्त होत आहे.  पाटण विधानसभा मतदार संघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येणारे शंभूराज हे राज्याचे माजी गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांचे नातू. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या विचारसरणीत वाढलेले पोलादी पुरूष म्हणून बाळासाहेब देसाईंचे नाव देशभर घेतले जाते, त्या बाळासाहेब देसाईंच्या नातवाचे नाव ना. एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या यादीत दिसल्याने मूळ शिवसैनिक आश्चर्य व्यक्त करत आहे.

शंभूराज देसाई हे शिवसेनेचे असले तरी पाटण विधानसभा मतदार संघात नेहमीच आपला स्वतंत्र गट वाढवण्याकडे त्यांचा कल राहिला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना सहकार परिषदेचे अध्यक्षपदही दिले होते. 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार आल्यावर शंभूराज देसाईंना मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, सातारा जिल्ह्यात शिवसेनेचा एकमेव आमदार निवडून येवूनही पुरंदरच्या विजय शिवतारे यांना राज्यमंत्रीपद देवून सातारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद बहाल करण्यात आले. विजय शिवतारे यांच्या कार्यपद्धतीवर सातारा जिल्ह्यातील जनता नाराज असतानादेखील शिवतारे यांना बदलण्यात आले नाही व त्या पाच वर्षात शंभूराज देसाईंना मंत्रीपद देण्यात आले नाही.

मात्र, याच कालावधीत शंभूराज व तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घसट खूप वाढली. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर एक वर्षभर शंभूराज भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. देवेंद्र फडणवीस व शंभूराज देसाई यांच्या मैत्रीचे अनेक दाखले दिले जात होते. फडणवीसांकडून देसाईंनी पाटण विधानसभा मतदार संघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे करून घेतली. त्यामुळे फडणवीस व देसाई आतुन एकच आहेत, अशी चर्चा त्यावेळी रंगायची. महायुतीच्या तिकिट वाटपात 2019 साली शंभूराज शिवसेनेच्या तिकिटावरच लढले आणि भक्कम मतांनी निवडूनही आले.

त्या कालावधीत एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होतील असेच वातावरण होते. मात्र, प्रत्यक्षात तसे घडले नाही. आकस्मिकपणे उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी नाराज झालेल्या ना. एकनाथ शिंदे यांनी आपल्या काही समर्थकांना मंत्रीपदे मागितली. असे बोलले जाते की एकनाथ शिंदे यांच्या इच्छेखातर उद्धव ठाकरे यांनी शंभूराज देसाई यांना गृह (ग्रामीण), अर्थ, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता पणन या एवढ्या खात्यांचे राज्यमंत्रीपद दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्या अवतीभोवती शंभूराज यांचा वावर कायम दिसायचा. तशी छायाचित्रेही प्रसिद्धीला यायची. सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी राज्यमंत्री देसाईंचा सायरन वाजत राहतो. ठाकरे परिवाराच्या जवळ असलेल्या शंभूराज देसाईंचे नाव नॉट रिचेबल आमदारांच्या यादीत येवूच कसे शकते? असा सवाल शिवसैनिकांमधून विचारला जात आहे. दिवसभर वृत्तवाहिन्यांमध्ये नाव झळकत असूनही शंभूराज देसाई यांच्याकडून कोणतेही स्पष्टीकरण अथवा खुलासा आला नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडात शंभूराज देसाई यांचाही समावेश तर नाही ना? अशी चर्चा सुरू झाली आहे.

Back to top button