सातारा : विद्युत पुरवठा खंडित केल्याने शेनवडीत महिला आक्रमक | पुढारी

सातारा : विद्युत पुरवठा खंडित केल्याने शेनवडीत महिला आक्रमक

वरकुटे-मलवडी : पुढारी वृत्तसेवा

शेनवडी, ता. माण येथील ग्रामपंचायत पाणीपुरवठा विहिरीवरील वीजपुरवठा महावितरणच्या कर्मचार्‍यांनी खंडित केल्याने शेनवडी गाव परिसरात पाच दिवसांपासून पाण्याची टंचाई जाणवत आहे. या विरोधात सरपंच लीनाताई कदम व महिलांनी महावितरणच्या सबस्टेशनवर मोर्चा काढत कार्यालयातच ठिय्या आंदोलन केले.

ग्रामपंचायतीचे विद्युत बिल थकीत असल्याने महावितरणने विद्युत पुरवठा खंडित केला होता. त्यामुळे पाच दिवस पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडाली. पाणी नसल्याने उद्भवणार्‍या समस्यांमुळे महिला आक्रमक झाल्या. महिलांनी महावितरणच्या ऑफिसमध्येच ठिय्या मारला. दरम्यान, कर्मचार्‍यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दुरध्वनीवरून या घटनेची माहिती कार्यकारी अभियंता राजेंद्र डावरे यांना दिली. त्यांनी तत्काळ विद्युत पुरवठा जोडण्याच्या सूचना केल्याने महिलांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी सुवर्णा कदम, राणी पाटोळे, काजल कदम, स्वाती बनसोडे, सुमन शिंगाडे, वैशाली कदम, पूनम काशीद, सखुबाई पारशी, जयश्री सकट, रेश्मा भिसे उपस्थित होत्या.

Back to top button