सातारा : अवघा 1 टक्‍का पेरा; पोशिंदा धास्तावला | पुढारी

सातारा : अवघा 1 टक्‍का पेरा; पोशिंदा धास्तावला

सातारा : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात अद्यापही पावसाने हुलकावणी दिली असल्याने खरीप हंगामातील अवघ्या 1 टक्काच पेरण्या झाल्याचे चित्र दिसत असल्याने जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी धास्तावला आहे. पावसाने ओढ दिल्याने शिवारात गलबला झाला असून शेतकर्‍यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. जिल्ह्यात खरीप हंगामाचे 3 लाख 81 हजार 972 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून आतापर्यंत अवघ्या 3 हजार 728 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे.

मागील गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली असल्याने खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. जून महिना निम्मा संपत आला असला तरी पावसाने ओढ दिली असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात खरीप हंगामाचे 3 लाख 81 हजार 972 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून आतापर्यंत सुमारे 3 हजार 728 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. परिणामी पावसाअभावी पेरणी झालेली पिके धोक्यात आली आहेत.

जिल्ह्यात खरीप हंगामात भात, सोयाबीन, भुईमूग, घेवडा, सूर्यफूल यासह अन्य पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जात असते. निम्मा जून महिना संपत आला असला तरी अद्यापही पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.उन्हाळ्यातही जिल्ह्यात पाहिजे असा पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतीमधील मशागतीची कामे झाली नाहीत. अनेक शेतामध्ये नांगरट केलेली ढिगळे तशीच दिसत आहेत. त्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. मान्सूनच्या तोंडावर पावसाने दडी मारली असल्याने खरीप हंगामावर चिंतेचे सावट निर्माण झाले आहे.

गतवर्षी जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाला होता. त्यामुळे पेरण्याही वेळेत पूर्ण झाल्या होत्या. जिल्ह्याच्या सातारा, वाई, महाबळेश्‍वर, जावली, पाटण, कराड तालुक्यातील पश्‍चिम भागात धुळवाफेवर पेरण्याची लगबग सुरु झाली आहे. भाताचे तरवे टाकण्याच्या कामात शेतकरी व्यस्त आहे. तर काही ठिकाणी पाण्याचे साधन आहे त्या ठिकाणी भाताचे तरवे चांगली उगवून आली आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 1 टक्का पेरणी झाल्याने पोशिंदा धास्तावला आहे. पावसाने ओढ दिल्याने शिवारात गलबला सुरू आहे. पेरलेली पिके कोमेजू लागली आहेत.

पेरणी झालेल्या पिकांना पाण्याची आवश्यकता असताना पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यासमोर संकट निर्माण झाले आहे. यंदा राज्यात चांगला पाऊस पडणार व वेळेपूर्वी मान्सूनचे आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्‍त केला होता. चांगला पाऊस पडणार असल्याने शेतकर्‍यांना खरीप हंगामासाठी मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र तो अंदाज फोल ठरला आहे. अद्यापही पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

Back to top button