सातारा : स्व. बाळासाहेब भिलारे शिष्यवृती प्रेरणादायी : प्रभावती कोळेकर | पुढारी

सातारा : स्व. बाळासाहेब भिलारे शिष्यवृती प्रेरणादायी : प्रभावती कोळेकर

पाचगणी; पुढारी वृत्तसेवा : महाबळेश्वरसारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले पाहिजे ही स्व. बाळासाहेब भिलारेदादांची तळमळ होती. स्पर्धा परीक्षेतील यशासाठी प्रेरित करण्याची ताकद या शिष्यवृत्तीतून प्राप्त होणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रभावती कोळेकर यांनी केले.

राजपुरी (ता. महाबळेश्वर) येथील कै. एम. आर. भिलारे हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी वाईचे शिक्षण विस्तार अधिकारी वाळेकर, हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन भिलारे, राजपुरीच्या सरपंच सौ. शीतल राजपुरे, खिंगरचे सरपंच दिनकर मोरे, आंब्रळच्या सरपंच सौ. माधुरी आंब्राळे, प्राचार्य जतिन भिलारे, मुख्याध्यापक प्रकाश बेलोशे, सौ. तेजस्विनी भिलारे, प्रकाश खरात उपस्थित होते. शिक्षणाधिकारी कोळेकर म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून पुढे जाण्याची प्रेरणा गुणवंतांकडून घ्यावी. भावी क्षेत्र निवडताना आपली आवड आणि क्षमता पहावी. शिक्षकांनीही अभ्यासाबरोबरच स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्तीकडे प्रभावीपणे लक्ष दिल्यास दादांच्या स्वप्नातील अधिकारी घडण्यास मदत होईल. नितीन भिलारे म्हणाले, दादांनी ग्रामीण भागातील मुली शिकल्या पाहिजेत यासाठी संस्था स्थापन करण्याचा हेतू आज साध्य होताना दिसत आहे. संस्थेच्या तिन्ही शाखांचा 100 टक्के निकाल लावण्याचे अभिनंदनीय काम शिक्षकांनी केले आहे. त्यामुळे दादांची स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू. यावेळी तुकाराम जाधव, हणमंत मांढरे, अजित राजपुरे, जितेंद्र शिर्के, संजय लोहार, महेश ननावरे, राकेश नेवसे, विद्या ननावरे उपस्थित होते.

Back to top button