सातारा : नव्या मैदानात आता नवी राजकीय इनिंग | पुढारी

सातारा : नव्या मैदानात आता नवी राजकीय इनिंग

कण्हेर : बाळू मोरे
हद्दवाढीमुळे शाहूपुरी नगरपालिकेत गेल्याने कोंडवे गटाची नव्याने रचना करण्यात आली. हा गट व त्याअंतर्गत असलेल्या गणांमध्ये लिंब व शेंद्रे गटातील अनेक गावे समाविष्ट झाल्याने प्रस्थापित राजकीय मंडळींना आता बरीच कसरत करावी लागणार आहे. कोंडवे गटाच्या पुनर्रचनेमुळे खर्‍या अर्थाने निवडणुकीला रंगत येणार आहे. इच्छुकांना आता नव्या मैदानात नवी राजकीय इनिंग सुरू करावी लागणार आहे.

सातारा शहराची हद्दवाढ झाल्याने शाहूपुरीचा संपूर्ण भाग नगरपालिकेत समाविष्ट झाला आहे. यामुळे नवीन कोंडवे जिल्हा परिषद गटाची रचना करण्यात आली असून यामध्ये शाहूपुरी, लिंब व शेंद्रे गटातील गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. कोंडवे गटामध्ये कोंडवे व जकातवाडी हे दोन गण सामाविष्ट केलेले आहेत. शाहूपुरी गटातील सैदापूर व कोंडवे ही दोन मोठी गावे, तर लिंब गटातील 15 व शेंद्रे गटातील 6 गावे असा हा कोंडवे गट तयार करण्यात आला आहे. येथील गट व गणांची नव्याने रचना करून गणांमध्ये उलट-सुलट गावे गेल्याने लोक संभ्रमावस्थेत असून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

जकातवाडी गण नव्याने करून कण्हेर परिसरातील गावांसह बोगद्याच्या पलिकडील व डोंगर माथ्यावरील अनेक गावे समाविष्ट झालेली आहेत. तर कोंडवेच्या परिसरातील इंगळेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेली इंगळेवाडी, ठोंबरेवाडी व बेबलेवाडी ही मधीलच गावे जकातवाडी गणात घातल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

कोंडवे गटात एकूण 24 ग्रामपंचायतींचा समावेश असून कोंडवे गणात काही मोठ्या लोकसंख्येच्या अशा एकूण 9 ग्रामपंचायती, तर जकातवाडी गणात 15 ग्रामपंचायती व त्या अंतर्गत असलेली 21 गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. गावांच्या आदलाबदलीमुळे अनेकांची कोंडी झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी इच्छुकांना पुन्हा नव्याने राजकीय समीकरणे जुळवावी लागणार आहेत. या गट व गणांमधील कार्यकर्त्यांना आपलाच उमेदवार निवडून आणण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. या गट व गणांमध्ये दोन्ही राजेंचे प्राबल्य असून दोन्ही गटांनी नव्याने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. परंतु आरक्षणावरच पुढची राजकीय गणिते अवलंबून राहणार आहेत. येथील इच्छुकांची संख्या वाढल्याने अनेक ठिकाणी उमेदवार देताना लोकप्रतिनिधींचा कस लागणार आहे.

Back to top button