लोणंद : देवदर्शन उरकून येणारा नवविवाहित ठार | पुढारी

लोणंद : देवदर्शन उरकून येणारा नवविवाहित ठार

लोणंद / साखरवाडी ; पुढारी वृत्तसेवा : फलटण तालुक्यासाठी रविवार हा घातवार म्हणूनच उजाडला. काळज येथे देवदर्शन करून येताना क्रूझर उलटली. यामध्ये बार्शी (जि. सोलापूर) येथील नवविवाहित युवकाचा मृत्यू झाला, तर नवविवाहिता जखमी झाली. आळजापूर येथे झालेल्या दुसर्‍या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. तालुक्यात दोन अपघातांत दोघांचा मृत्यू झाला.

काळज येथील अपघातात नवरदेव सुखदेव रवीद्र वाघमोडे (वय 26, रा. बार्शी, जि. सोलापूर) व आळजापूर येथील अपघातात शहाजी मल्हारी मिसाळ (वय 50, रा. आदर्की बुद्रक, ता. फलटण) यांचा मृत्यू झाला आहे.

सुखदेव वाघमोडे यांचा काही दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. विवाहानंतर ते रविवारी पुण्यातील जेजुरी येथील खंडोबाच्या दर्शनासाठी गेले होते. जेजुरीत दर्शन घेतल्यानंतर ते फलटण तालुक्यातील धूळदेव येथील धुळोबादेवाच्या दर्शनासाठी निघाले होते. दुपारी 4 च्या सुमारास काळज गावच्या हद्दीत त्यांची क्रूझर आली असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे क्रूझर पलटी झाली. गाडी पलटी झाल्यानंतर परिसरात एकच हलकल्लोळ माजला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी गर्दी केली.

क्रूझरमध्ये नवविवाहित दाम्पत्य होते. अपघातात नवरदेव सुखदेव हा गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याला फलटण येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, उपचार करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तर क्रूझरमधील नवविवाहितेसह अन्य प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती फलटण पोलिसांना दिल्यानंतर तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

दुसरा अपघात आळजापूर गावच्या हद्दीत वाठार स्टेशन – फलटण रोडवर दुचाकीने उभ्या असलेल्या ट्रकला पाठिमागून धडक दिल्याने झाला. या अपघातात शहाजी मिसाळ यांचा जागीच मृत्यू झाला. आळजापूर-कापशी येथील मुख्य चौकात एक ट्रक सातारा बाजूकडे जात असताना शनिवारी रात्री रस्त्यावरच बंद पडला. रविवारी दुपारी दीड वाजता शहाजी मिसाळ हे या रस्त्याने आदर्कीकडे जात होते. यावेळी समोरून येणारे वाहन पाहून त्यांच्या दुचाकीचा वेग नियंत्रित करत असताना ट्रकवर दुचाकी आदळली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद हणमंत काकडे यांनी लोणंद पोलिस ठाण्यात दिली आहे.

Back to top button