कराड : ‘दक्षिण’च्या डोंगरी भागात अवैध वृक्षतोड | पुढारी

कराड : ‘दक्षिण’च्या डोंगरी भागात अवैध वृक्षतोड

उंडाळे : पुढारी वृत्तसेवा

कराड दक्षिणच्या डोंगरी भागात अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. वनखाते मात्र डोळ्यावर पट्टी टाकून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून दिवसाढवळ्या विभागात अवैध वृक्षतोड सुरू आहे. वृक्षतोडीनंतर या लाकडांचा परस्पर बाजार करण्यात येत असून एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असताना वनविभाग झोपेचे सोंग घेत असल्यामुळे पर्यावरणप्रेमी, ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

कराड दक्षिण भागात डोंगरकपारीत व शेताच्या बांधावर मोठ्या प्रमाणात विविध जातीचे वृक्ष आहेत. याशिवाय परिसरात डोंगर व जंगल परिसर राखीव आहे. या परिसरातच मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड केली जात आहे. दक्षिणेच्या डोंगरी भागात येळगाव , गोटेवाडी, भूरभूशी भरेवाडी, येणपे, मस्करवाडी, परिसरात जांभूळ, आंबा, सागवान यासह फणस, बाभूळ, करंज, वाळवी, खैर, शिवर व अन्य जंगली वृक्ष असून या परिसरात लाकूड व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात अधिकार्‍यांना हाताशी धरून वृक्षतोड करत आहे. तोडणी केलेले वृक्ष अवैध मार्गाने तोडणी करून नंतर थेट रस्त्यानेच वाहतूक करून ज्या ठिकाणी लाकूड कापण्याच्या गिरणी आहेत तेथे कापून त्याची परस्पर विक्री केली जात आहे. नांदगाव, काले, येळगाव, मस्करवाडी, आचरेवाडी, गुढे, पाचगणी या सर्व परिसरात ही कामे सुरू असून तोडणी केलेला लाकडाचा माल शेडगेवाडी, कोकरूड, शिराळा परिसरात घेऊन त्या बाजूला गिरणीत कापणी करून विक्री केला जातो. मस्करवाडी, भूरभूशी, आचरेवाडी परिसरात सागवान सह इतर झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याशिवाय घोगाव व तुळसण परिसरात शासनाने केलेल्या वनीकरणातील लहान-मोठी झाडे जळणासाठी तोडणी करून याच भागातील लोक जळणासाठी मोठ्या प्रमाणात वापरत आहेत. या तोडणीकडेही वनखात्याचे संपूर्ण दुर्लक्ष असून तुळसण, पाचपुतेवाडी परिसरात हीच परिस्थिती आहे.
वनविभागाच्या अधिकार्‍यांना वृक्षतोडी संदर्भात माहिती उपलब्ध असते. परंतु ते त्या विभागात नसतात मात्र चुकून एखाद्या शेतकर्‍याने झाड तोडले तर परवानगीच्या नावाखाली त्याला दंडुका दाखवत कारवाईची भीती घालतात. पण दुसर्‍या बाजूला शेकडो झाडांची कत्तल करणार्‍या व्यापार्‍यांवर मात्र कारवाई न करता त्याच्या संगतीला बसून पार्टी झोडताना दिसतात अशीही चर्चा असून त्यांना आवर करणे गरजेचे आहे, अशी मागणी होत आहे.

गोटेवाडी, भरेवाडी या परिसरातील सागवान किंवा अन्य मोठी झाडे शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी परिसरातील व्यापारी तोडणी करताना दिसतात.

वनविभाग नेमके करते काय?

गेल्या अनेक वर्षांपासून या भागात असणारी झाडे मोठी झाली होती. ती आता तोडणीने हळूहळू कमी होत चालली असून ही झाडी वाढवणे व जतन करण्याऐवजी तोडणीचे काम सुरू असल्याने वनविभाग नेमके काय काम करते असा प्रश्न निर्माण होत आहे. वनविभागाच्या दुर्लक्षामुळे बिबटे व अन्य वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत शिरकाव वाढला आहे व त्यांना पर्याय उरलेला नाही. सध्या विभागातून वृक्ष तोडणीचे काम जेथे सुरू आहे तेथे वनखात्याने कारवाई करणे गरजेचे आहे. परंतु हे खाते जेथे वृक्षतोड सुरू आहे त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत त्यांना अप्रत्यक्षपणे अभय देत आहे, अशी चचार्र् होत आहे.

Back to top button