पाटण : एकसष्ठी गाठणाऱ्या कोयनेचा इतिहास | पुढारी

पाटण : एकसष्ठी गाठणाऱ्या कोयनेचा इतिहास

पाटण : गणेशचंद्र पिसाळ

महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्रप्रदेश राज्यांची वरदायिनी ठरलेल्या कोयना धरणाचा 61 वा वर्धापन साजरा होत आहे. सद्य:स्थितीत निम्म्याहून अधिक महाराष्ट्राची सिंचन व विजेची गरज भागवणार्‍या याच धरणाने 11 डिसेंबर 1967 च्या विनाशकारी भूकंपासह आजवर तब्बल सव्वा लाखाहून अधिक भूकंप पचविले. या 61 वषार्ंत अतिवृष्टी, महापूर, भूस्खलनासारख्या नैसर्गिक तर मानवनिर्मित तांत्रिक, शासकीय, प्रशासकीय आपत्तींचाही तितक्याच ताकदीने सामना केला. आजूबाजूच्या सह्याद्रीसह अन्य पर्वतरांगांच्या माध्यमातून जंगले अबाधित ठेवली. कोयना अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र पश्चिम घाट प्रकल्प, इको सेन्सिटिव्ह झोन अशांनाही साथ देत पर्यावरण राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत ‘कोयनामाई ’ हे विशेषण सार्थकी लावले.

सन 1957 ला राज्यातील पाणी व विजेची गरज लक्षात घेऊन कोयना धरणाच्या कामाला सुरुवात झाली. 1961 ला धरणात पाणी अडवले गेले, तर 1963 नंतर हे धरण पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाले. महाराष्ट्रासह देशातील एक मोठे धरण म्हणून याचा नावलौकिक आहे. या धरणावर पोफळी, अलोरे, कोयना चौथा टप्पा व कोयना धरण पायथा वीजगृह अशा तब्बल चार टप्प्यातून 1960 मेगावॉट जलविद्युत निर्मिती केली जाते. अत्यंत स्वस्त दरातील वीज निर्मितीमुळे राज्याला यातून अब्जावधी रुपयांचा महसूल मिळतो. या धरणामुळे पूर्वेकडील पूर, महापुरामुळे होणारी वित्त अथवा जीवित हानी कमी करण्यात वर्षानुवर्षे यश आले आहे. या धरणाबाबत अनेकदा जाणीवपूर्वक संभ्रम, गैरसमज निर्माण केले जातात. मात्र ‘कोयना’ हे सार्वत्रिक वरदान ठरले, याचा महाराष्ट्राला नेहमीच अभिमान आहे.

धरणात बहुतांशी वेळा मूळच्या क्षमतेपेक्षाही अधिक दुप्पट ते तिप्पट पाण्याची आवक होते. पाण्याच्या नियोजनाची जलसंपदा तर वीज निर्मितीची जबाबदारी वीज पारेषण कंपनीवर असते. कृष्णा पाणी वाटप लवादानुसार धरणातील एकूण पाणी साठ्यापैकी दरवर्षी 67.50 टीएमसी पाणी हे पश्चिमेकडील पोफळी, कोयना चौथा टप्पा, अलोरे या 1920 मेगावॉट क्षमतेच्या तीन प्रकल्पांसाठी आरक्षित ठेवले आहे. धरणाचे तांत्रिक जल वर्ष हे 1 जून ते 31 मे या कालावधीत चालते. सरासरी दर वर्षीचा पाऊस लक्षात घेता सुमारे पाच हजार मिलिमीटर पावसाची या धरणांतर्गत विभागात नोंद होते. याशिवाय पूर्वेकडे सिंचनासाठी किंवा अतिवृष्टी, महापुराच्या काळात सोडण्यात येणार्‍या पाण्यावर कोयना धरणाच्या पायथ्याशी असलेल्या जलविद्युत प्रकल्पातून 40 मेगावॉट क्षमतेने वीज निर्मिती करून ते पाणी पूर्वेकडे सोडण्यात येते. पावसाळा वगळता इतरवेळी या पाण्याचा सिंचनासाठी वापर केला जातो.

कोयना धरणाच्या जलाशयाला ‘शिवसागर’ म्हणून संबोधले जाते. कोयना ते तापोळा या तब्बल 67.500 किलोमीटर अंतरावर हा विस्तीर्ण शिवसागर जलाशय पसरलेला आहे. या धरणाचे वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक मोठा परिसर छोटे-मोठे डोंगर यामुळे या महाबलाढ्य पाण्याचा दाब हा धरणाच्या मुख्य भिंतीवर न येता तो आजूबाजूच्या डोंगरांवर पसरला गेल्याने इतर धरणांच्या तुलनेत या धरणाची लांबी अत्यंत कमी आहे. पूर्वी वीज निर्मिती हा प्रमुख उद्देश ठेवून या धरणाची निर्मिती झाली होती. सिंचनासाठी वाढलेली पाण्याची गरज टेंभू , ताकारी, म्हैसाळ सारखे निर्माण झालेल्या नवीन प्रकल्पांमुळे वीज निर्मिती सोबतच सिंचनाला प्राधान्यक्रम देण्यात आला. गेल्या काही वर्षांत सरासरी 35 ते 36 टीएमसी पाणी सिंचनासाठी वापरले गेले. कोयना जलविद्युत प्रकल्पांची वीजनिर्मिती क्षमता भलेही 1960 मेगावॉट असली तरी लवादाचा 67.50 टीएमसी आरक्षित पाणी कोट्यामुळे येथे वर्षभरात क्षमतेच्या सरासरी 20 टक्के वीज निर्मिती होते. पावसाळ्यात कमी तर उन्हाळ्यात ज्यादा मागणीच्या काळात ज्यादा वीज निर्मिती केली जाते आणि याचा राज्याला फायदाच होतो.

2005-06 साली धरणाच्या साठवण क्षमतेत वाढ..!

धरणाचा जलाशय हा चारही बाजूंनी कोयना अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, पश्चिम घाट प्रकल्प, इको सेन्सिटिव्ह झोन आदी पर्यावरण पूरक जंगले, घनदाट वनस्पती असा पसरला असल्याने येथे तुलनात्मक जमिनीची धूप कमी होते. त्यामुळे त्याचा पाणी साठ्यावर फारसा परिणाम होत नाही.धरणाची पूर्वी 98.78 टीएमसी पाणी साठवण क्षमता होती. सन 2005 -2006 ला धरण भिंतींचे मजबुतीकरण करून व दरवाजांची उंची वाढवून साडेसहा टीएमसीने साठवण क्षमता वाढवली ती 105.25 टीएमसी झाली. अत्यंत कमी खर्चात व कोणत्याही पुनर्वसनाशिवाय ही वाढ झाली. अशा प्रकारचा हा देशातील एक वेगळाच प्रकल्प ठरला.

1999 पहिले तर 2012 साली दुसरे लेक टॅपिंग…

धरणातील पाणीसाठा व पश्चिम वीज निर्मितीचा विचार करता कोयना चौथा टप्प्यासाठी पहिल्यांदा सन 1999 ला पहिले व 2012 ला दुसरे लेक टॅपिंग करण्यात आले. यातून अतिरिक्त एक हजार मेगावॉट वीजनिर्मिती सुरू झाली. जलाशयातील जलपातळी 630 मीटरवर गेल्यानंतर एप्रिल महिन्यांनंतर ऐन उन्हाळ्यात राज्याला विजेअभावी अंधाराला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे दुसरे लेक टॅपिंग करून जलपातळी 618 मीटरपर्यंत खाली आणून राज्याला अखंडीत वीज निर्मिती पुरवण्यात आली. दोन वेळा लेक टॅपिंगचे अत्यंत धाडशी व आशिया खंडातील पहिलेच प्रयोग झाले. धरणात पाणीसाठा असतानाही अशा प्रकारचे धाडसी प्रयोग यशस्वी करण्याचे आव्हान भारतीय तंत्रज्ञान व अभियंत्यांनी यशस्वी करून दाखवले. लेक टॅपिंगसाठी लागणारी स्फोटके जर्मनीतून आणण्यात आली. मात्र, उर्वरित सर्व तंत्रज्ञान हे भारतीयांचे होते, हे देखील अभिमानास्पद आहे .

Back to top button