सातारा : खंडित वीजपुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त | पुढारी

सातारा : खंडित वीजपुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त

उंडाळे (सातारा),  वैभव पाटील :  कराड दक्षिण परिसरात वीज टंचाईच्या नावाखाली सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असून खंडित वीजपुरवठ्यामुळे सामान्य जनतेसह शेतकरी त्रस्त झाला आहे. daवीज वितरणच्या या ढिसाळ कामकाजामुळे शेतकरी वर्गातून तीव्र असंतोष निर्माण झाला असून शेतकर्‍यांना वेळेवर वीज पुरवठा करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

उंडाळेसह कराड दक्षिणच्या डोंगरी विभागात गेल्या चार ते पाच महिन्यांपासून घरगुती व शेतीसाठी वीजपुरवठा करण्यात येणारी यंत्रणा सातत्याने कुचकामी ठरत आहे. वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शेतीसाठी आठ तास वीजपुरवठा करणार्‍या महावितरणच्या नव्याने सुरू झालेल्या भारनियमनाने आता तीन ते चार तासच वीजपुरवठा सुरू ठेवला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात शेतीला पाणी देणे अवघड बनले आहे. कारण उन्हामुळे शेतीला पाण्याची अधिक गरज असल्याने एका तासात एक सरीही पाणी पिकांना मिळत नाही. उंडाळेसह परिसरात दिवसभरात अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होत असतो सायंकाळी वीज खंडित होणे नित्याचेच झाले आहे. याचा मनस्ताप ग्राहकांना होत आहे. पण याचे देणे घेणे वीज मंडळाच्या कर्मचारी वर्गाला नाही.

वीजपुरवठा खंडित असल्याबाबत विचारणा करण्यासाठी फोन केला असता संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांचे व कर्मचार्‍यांचे फोन लागत नाहीत. त्यातून एखाद्या कर्मचार्‍याचा किंवा अधिकार्‍याचा फोन लागला तर संबंधित कर्मचारी फोनच उचलत नाहीत. त्यामुळे ग्राहकांमधून तीव्र मनस्ताप व्यक्त केला जात आहे. अधिकारी व कर्मचार्‍यांच्या या वर्तणुकीबद्दल विभागातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी नियमित वीजपुरवठा करण्याबाबत संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना सूचना देणे गरजेचे आहे.

वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांना सातत्याने वीजदर आकारणीचा झटका देत सातत्याने वीज वापरापेक्षा अधिभार अधिक लावून अधिक पैसे ग्राहकांच्या माथी मारतात व भरमसाठ बिल देऊन ग्राहकाचे कंबरडे मोडतात.

वीजपुरवठा करताना वीज मंडळ ग्राहकांना वीजपुरवठा खंडित करून झटका देत आहे. इतकेच काय पण लॉकडाऊन काळात ग्राहकांना वेळेत वीज न देता दुप्पट वीज बिल ग्राहकांच्या माथी मारून ग्राहकांची मोठी आर्थिक फसवणूक करत आहे. वीज मंडळाचे प्रशासन ग्राहकांना वीज बिलात सवलत देणार होते; पण पुन्हा वीज कंपनीने वीज बिल वसुलीचा तगादा लावत वीज बिल वसूल केले व ग्राहकांचा विश्वासघात केला अशा भावना ग्राहकांमध्ये निर्माण झाली आहे.

नवा भुर्दंड ग्राहकांना सोसवेना

वीज वितरण कंपनीने एप्रिल महिन्यात ग्राहकांना वीज बिल देताना स्वतंत्र दिड ते 2 हजार रुपयांच्या पुढे डिपॉझिट चे बिल देऊन नवा डिपॉझिटचा फंडा सुरू केला आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये शेती व घरगुती ग्राहकांना दोन- दोन वीजबिले आली आहेत. अगोदरच थकीत असणार्‍या वीज ग्राहकांना हा नवा एक हजाराचा भूर्दंड सोसेना झाला आहे.

Back to top button