वाई : घोटाळेबाज अध्यक्षांमुळे कारखाना रसातळाला | पुढारी

वाई : घोटाळेबाज अध्यक्षांमुळे कारखाना रसातळाला

वाई : पुढारी वृत्तसेवा

किसनवीर सहकारी साखर कारखाना हा जिल्ह्यातील सहकाराचा मानबिंदू होता. किसनवीर आबांनी मोठया दूरदृष्टीने शेतकर्‍यांच्या हितासाठी सुरु केला. घोटाळेबाज अध्यक्षांसह संचालकांनी चुकीची धोरणे राबवून हा कारखाना रसातळाला नेला. स्वत:ची पापं झाकण्यासाठी आता शेतकरी सभासदांना थापा मारुन त्यांची दिशाभूल सुरु आहे. त्यांचा हा डाव शेतकर्‍यांनी ओळखला असून त्यांना कदापि थारा देणार नाहीत, असा विश्वास आ. मकरंद पाटील यांनी व्यक्त केला.

कोरेगाव व वाई तालुक्यात किसनवीर कारखाना बचाव पॅनलच्या मेळाव्यादरम्यान ते बोलत होते. यावेळी आ. शशिकांत शिंदे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

आ. मकरंद पाटील म्हणाले, किसनवीर सहकारी साखर कारखान्याची अवस्था शेतकरीच नव्हे तर आख्खा महाराष्ट्र बघत आहे. गेल्या वर्षीचे शेतकर्‍यांचे कोट्यावधीचे देणे बाकी असताना तसेच कामगारांचे दोन वर्षे पगार नाहीत, इतकी भयावह अवस्था असताना कारखान्याचे अध्यक्ष मात्र भुलभूलैय्या करण्यात पटाईत आहेत. निवडणूक लागली की लगेच यांनी कारखाना सुरु करण्याचे नाटक केले. शेतकर्‍यांबाबत एवढी तळमळ होती तर अगोदर कारखाना का सुरु केला नाही? ही बनवाबनवी आता तरी बंद करा. शेतकर्‍यांना तुमचे कर्तृत्व दिसले आहे. तुम्ही आता काहीही थापा मारल्या, बिनबुडाचे काहीही आरोप केले, शेतकर्‍यांची कितीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. ड्रामेबाज अध्यक्ष आता आमच्यावर कारखाना घशात घालण्याचा डाव करत असल्याचा आरोप करत आहेत. मात्र त्यामध्ये काडीचेही तथ्य नाही. पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी अपप्रचार करुन शेतकर्‍यांची दिशाभूल करत आहेत. शेतकर्‍यांची सहानुभुती मिळवण्यासाठीच त्यांनी आटापिटा सुरु केला आहे. मात्र हे सगळं किती खोटं आहे, हे सभासदांना सांगण्याचीही गरज नाही. किसनवीर आबांनी मोठया दूरदृष्टीने शेतकर्‍यांच्या हितासाठी चालू केला. तात्यांनी कारखाना सोडला तेव्हा अवघे साडेसहा कोटीचे नियमित कर्ज होते. विद्यमान अध्यक्षांनी आता कारखान्याची बिकट अवस्था करुन ठेवली आहे.

आ. पाटील पुढे म्हणाले, आम्ही गेली अनेक वर्षे सांगत होतो मदन भोसले कारखाना बुडवतील पण लोकांनी त्यावेळी विश्वास ठेवला नव्हता पण आता सार्‍यांनाच या बाबी पटल्या. कारखाना बुडवून उजळ माथ्याने ते वावरत आहेत. कारखान्याविषयी विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यास भाग पाडून अजूनही शेतकर्‍यांची दिशाभूल चालू आहे.

गावोगावी फिरून ताळेबंद मांडणार

किसनवीर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने खंडाळा तालुक्यातील सभासदांशी सभेच्या माध्यमातून संवाद साधला जाणार आहे. कारखाना निवडणूक आपण का लढत आहोत हे सभासदांना पटवून देणार आहे. गावोगावी फिरून कारखान्यातील सत्ताधार्‍यांच्या कारभाराचा ताळेबंद मांडणार आहे. कार्यकर्त्यांनीही मतदारांशी प्रत्यक्ष भेटून आपली भूमिका समजून देण्यावर भर द्यावा, असे आवाहन आ. मकरंद पाटील यांनी खंडाळा येथे झालेल्या बैठकीत बोलताना केले. खंडाळा येथे लवकरच सभा घेतली जाणार आहे. त्यापार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीस एस.वाय. पवार, बकाजीराव पाटील, दत्तानाना ढमाळ, नितीन भरगुडे-पाटील, शामराव गाढवे, मनोज पवार, हणमंतराव साळुंखे, डॉ. नितीन सावंत, चंद्रकांत ढमाळ, शारदाताई जाधव उपस्थित होत्या.

Back to top button