कराड : बसस्थानक परिसरात ‘रिक्षां’ची मनमानी | पुढारी

कराड : बसस्थानक परिसरात ‘रिक्षां’ची मनमानी

कराड :  पुढारी वृत्तसेवा :  दोन वर्षापूर्वी राबवण्यात आलेली अतिक्रमण मोहिम पालिका प्रशासनाच्या आजवरच्या दुर्लक्षामुळे पाण्यात गेली आहे. बसस्थानक परिसरात पदोपदी रिक्षा चालक, अ‍ॅपेरिक्षा तसेच वडाप वाहनांची मनमानी सुरू असल्याचे दिवसभर पहावयास मिळते.

वाहतूक पोलिसांकडून केवळ सर्वसामान्य दुचाकी अथवा चारचाकी वाहन चालकांवर नियम भंग केल्याचे कारण दाखवत कारवाईचा दंडुका उगारला जातो. मात्र सिग्नल चौक तसेच मुख्य पोस्ट ऑफिसकडे जाणारा मार्ग, राज मेडिकल परिसर तसेच विजय दिवस चौक परिसरात अधिकृत रिक्षा थांबे आहेत. त्याचबरोबर काही अनधिकृत रिक्षा थांबे, वडाप थांबेही आहेत.

रस्त्यावर कशाही पद्धतीने रिक्षा, वडाप वाहने दिवसभर उभी असतात. मात्र वाहतूक पोलिसांना हे दिसत नाही. पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत तर न बोललेच बरं, अशी विदारक अवस्था आहे.

पोस्ट ऑफिसकडे जाणार्‍या मार्गालगत एकाच ठिकाणी दोन वेगवेगळे रिक्षा थांबे पहावयास मिळतात. त्यामुळेच या परिसरात वाहतूक कोंडी होते. वर्षानुवर्ष अशीच परिस्थिती असूनही प्रशासनाला मात्र हे दिसत नाही, हे दुर्दैव आहे.

सिंग्नल चौकात नो – पार्किंग असूनही रिक्षा चालकांसह वडाप चालकांची अशा पद्धतीने खुलेआम मनमानी सुरू असते. त्यामुळेच कराडात कायदा सर्वांसाठी समान आहे का ? असा प्रश्न सर्वसामान्य चालकांच्या मनात निर्माण होतो.

Back to top button