सांगली, पुढारी वृत्तसेवा : sangli murder : मारहाणीबाबत पोलिस ठाण्यात तक्रार केल्याच्या रागातून मुलाने वडिल किसन जोतीराम माने (वय 55) यांचा डोक्यात पहार घालून निर्घृण खून केला. त्यानंतर संशयित मुलगा विजय किसन माने (30, रा. माधवनगर बायपास रस्ता, मिरज) हा फरारी झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, माने कुटुंबीय माधवनगर बायपास रस्त्यावर राहण्यास आहे. दोन दिवसांपूर्वी विजय याने आईवडिलांना मारहाण केली होती. याबाबत वडिल किसन यांनी पोलिस ठाण्यात मुलाविरुद्ध तक्रार दिली होती. याबाबत बुधवारी दुपारी पोलिस ठाण्यात तक्रार का केली? असा जाब विजय याने किसन यांना विचारला. यावेळी दोघांमध्ये वादावादीचा प्रकार घडला. त्यानंतर पोलिसात तक्रार केल्याने चिडलेल्या विजय याने रागाच्या भरात किसन यांच्या डोक्यात पहारीने हल्ला केला. यामध्ये किसन यांच्या डोक्यात वर्मी घाव बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक अशोक वीरकर, महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक रविराज फडणीस यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठविला.
मयत किसन माने हे मोलमजुरी करून कुटुंब चालवित होते. त्यांचा मुलगा विजय माने हा काहीच काम करीत नव्हता. तसेच तो वारंवार घरातील सदस्यांना मारहाण करीत असे. दोन दिवसांपूर्वी देखील विजय याने घरात वाद झाल्यानंतर आई-वडिलांना मारहाण केली होती.
याबाबत किसन माने यांनी मुलाविरुद्ध मारहाणीची तक्रार दिल्यानंतर गांधी चौक पोलिसांनी विजय माने याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करुन मंगळवारी त्यास सोडले होते. यामुळे संतापलेल्या विजय याने पोलिसांत तक्रार केल्याच्या कारणावरुन बुधवारी वडिलांशी वादावादी करून करुन त्यांच्या डोक्यात पहार घालून त्यांचा खून करून पलायन केले.
याबाबत विजय माने याच्याविरुद्ध महात्मा गांधी चौक पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पालिसांनी घटनास्थळावरून गुन्ह्यात वापरेली पहार जप्त केली आहे. पलायन केलेल्या विजय माने याचा पोलिसांकडून शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.