एनएलसी इंडिया : 'कोळसा उत्पादन २० दशलक्ष टनपर्यंत वाढवण्याचा मानस' - पुढारी

एनएलसी इंडिया : 'कोळसा उत्पादन २० दशलक्ष टनपर्यंत वाढवण्याचा मानस'

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

देशांतर्गत कोळशाची वाढती मागणी लक्षात घेऊन एनएलसी इंडिया लिमिटेड चालू वर्षात तालाबिरा खाणीचे कोळसा उत्पादन १० दशलक्ष टन पर्यंत आणि पुढील वर्षापासून २० दशलक्ष टन पर्यंत वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे केंद्रीय कोळसा मंत्रालयाकडून बुधवारी स्पष्ट करण्यात आले.

एनएलसी इंडिया लिमिटेड, या सार्वजनिक क्षेत्रातील नवरत्न कंपनीच्या ओडिशा येथील २० एमटीपीए तालाबिरा-२ आणि ३ ओपन कास्ट माईनने पहिल्या पूर्ण वर्षाच्या परिचालनादरम्यान आतापर्यंत २ दशलक्ष टन कोळसा उत्पादनाचा टप्पा ओलांडला आहे. एनएलसी इंडिया लिमिटेडने चालू वर्षात आधीच्या ४ दशलक्ष टन उद्दिष्टाऐवजी वार्षिक ६ दशलक्ष टन उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पावले उचलली आहेत, हे विशेष.

उत्पादित कोळसा एनएलसीआयएलची उपकंपनी तुतीकोरिन इथल्या एनएलसी तामिळनाडू पॉवर लिमिटेडच्या २x५०० मेगावॅट वीज निर्मिती संयंत्रांकडे नेला जातो. ही सगळी निर्माण होणारी वीज दक्षिणी राज्यांची गरज भागवत असून यात तामिळनाडूचा मुख्य हिस्सा ४०% पेक्षा जास्त आहे.

कोळसा मंत्रालयाने खनिज सवलत नियमांबाबत खाण आणि खनिजे (विकास आणि नियमन) कायद्यात अलीकडेच सुधारणा केल्यामुळे, एन्ड यूज संयंत्राची कोळशाची गरज भागवल्यानंतर अतिरिक्त कोळसा विक्री खाणींना करता येते.त्यानुसार अतिरिक्त कोळसा विकण्यासाठी कोळसा मंत्रालयाकडे परवानगी मागण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button