जत : बागलवाडीत ८० हजारांच्या डाळिंबांची चोरी

जत : बागलवाडीत ८० हजारांच्या डाळिंबांची चोरी
Published on
Updated on

जत, पुढारी वृत्तसेवा : बागलवाडी (ता. जत) येथे शेतकरी राजेंद्र कदम यांच्या डाळिंब बागेतील अज्ञात चोरट्यांनी  ८०० किलो डाळींब चोरल्याची घटना घडली आहे. चोरीस गेलेले डाळिंब परिपक्व आणि निवडक आहेत. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत ७० ते ८० हजार रुपये आहे. मंगळवार दि. १२ रोजी सकाळी कदम नेहमीप्रमाणे शेतात गेल्यानंतर डाळींब चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. दरम्यान ही घटना सोमवारी रात्री घडल्याचा संशय कदम यांनी व्यक्त केला. ही घटना पोलिसात नोंद नाही.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मूळचे वाळेखिंडी येथील रहिवाशी असणारे शेतकरी  राजेंद्र कदम यांची डाळींब बागेची शेती राहत्या घरापासून ६ किलोमीटरवर अंतरावर बागलवाडी येथे आहे. अत्यंत कष्टाने गेल्या अनेक वर्षांपासून ते डाळींब बागेची शेती करतात. बागलवाडी गावालगत अगदी हाकेच्या अंतरावर व लोकवस्तीच्या जवळच त्यांची शेती आहे. याच बागेतून डाळिंबीची चोरी झाली आहे. तर मागील आठवड्यात तालुक्यातील वाळेखिंडी येथील शेतकरी कृष्णदेव माधवराव शिंदे यांच्या बागेतून एक लाख रुपयांची डाळींब अज्ञाताने चोरून नेल्याची घटना घडली होती. शिंदे यांनी जत पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अद्यापही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही.

दरम्यान वाळेखिंडी येथील शेतकरी व उद्योजक महादेव हिंगमीरे यांचीसुद्धा गावच्या उत्तर दिशेला डाळींब बाग आहे. एप्रिल २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात या बागेतील ४ लाख रुपये किंमतीच्या डाळींबाची चोरी अज्ञाताने केली होती. शिवाय चोरी करताना शेतातील मजूरांनी पाठलाग केला असता अज्ञात चोरट्यानी दगडफेक केली होती. याबाबत हिंगमीरे यांनी जत पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, तपास संथ गतीने सुरू आहे, त्यामुळे शेतकऱ्यांतून याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

कोरोनाच्या महामारीत व लॉकडाउनमुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या मेटाकुटीला आला होता. सध्या हळूहळू बाजाराला चालना मिळत आहे. आयुष्यातील अनेक स्वप्ने घेऊन पुन्हा शेतकरी जोमाने कामाला लागला आहे. अतिशय कष्टाने फुलविलेल्या बागांच्या चोऱ्या होत आहेत. अशी अवस्था झाल्याने जत उत्तर भागतील डाळींब उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.

डाळिंब चोरीच्या प्रकरणात तपास संत 

सध्या अनेक शेतकऱ्यांच्या डाळींब बागा परिपक्व झाल्या आहेत. उत्तम दर्जाच्या डाळींबाला सध्या ११० ते १२० रुपये  इतका किलोला दर मिळत असल्याने चोरट्यानी लक्ष आता या बागाकडे दिले आहे. शिवाय रस्ता लगत व निर्मनुष्य, डोंगरात असलेल्या बागा अज्ञात चोरट्यानी लक्ष बनविल्या आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी एकत्रित येत गट करून बागेचे संरक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. यापूर्वी डाळिंबची चोऱ्या होऊन अनेक महिने झाले तरीही तपासात कोणतीही प्रगती नसल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत तपास होत नसल्याने पोलीस ठाण्यात तक्रार कोणी देण्यास धजावत नाही असा प्रकार जत तालुक्यात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news