मुळशीतील खड्ड्यांमुळे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ओढावली नामुष्की | पुढारी

मुळशीतील खड्ड्यांमुळे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ओढावली नामुष्की

पिरंगुट : पुढारी वृत्तसेवा

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे मुळशीच्या दौऱ्यावर असताना त्यांना मुळशीतल्या खड्ड्यांमधून प्रवास करीत मार्गस्थ व्हायला लागल्याने त्यांच्याच खात्यामुळे त्यांच्यावर भलतीच नामुष्की ओढवलेली मुळशीकरांनी पाहिली, याबाबत तालुक्यात सध्या चर्चेला उधाण आले आहे. मुळशी तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या निष्क्रियतेवर यामुळे अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. मंत्र्यांनादेखील न जुमानणारे मुळशीचे सार्वजनिक बांधकाम खाते मुळशीकरांना कशी सेवा देत असेल याची प्रचिती यातून आली.

मुळशीत दमदार खड्ड्यांनी स्वागत झालेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी या खड्ड्यांवर बोलणे टाळले, त्यांनी यावर बोलून नागरिकांना दिलासा देणे आवश्यक असताना असे न झाल्याने लोकांची निराशा झाली. मुळशीकरांच्या पाठीशी शिवसेना असल्याचे वचन मंत्र्यांनी मग दिल्या वचनाला जागून मुळशीतल्या सार्वजनिक बांधकाम खात्याची झाडाझडती घेण्याचे औदार्य दाखवणार का? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

पुणे : वानवडीमध्ये लेफ्टनंट कर्नल महिलेची आत्महत्या

आमदार संग्राम थोपटे, खासदार सुप्रिया सुळे यांनादेखील न जुमानणाऱ्या रस्ते बांधणीच्या ठेकेदारांनी उरलीसुरली मंत्र्यांचीही किंमत ठेवली नाही. एवढे धाडस या ठेकेदारांकडे आले कुठून? त्यांना सार्वजनिक बांधकाम खाते पाठीशी घालत आहेत का? बांधकाम विभागाकडून या सुस्त आणि मस्तवाल ठेकेदारांचा अहवाल शासनास जाऊन त्यांना काळ्या यादीत टाकण्याची शिफारस का करीत नाही? स्थानिक लोकं काही ठिकाणी अडवणूक करतात, असं सांगून हे ठेकेदार स्थानिकांवर चालढकल करीत असतात. मात्र, अशी चालढकल करताना ते रस्त्याच्या दर्जाबाबत काळजी का घेत नाहीत? रस्त्याचा दर्जा, रुंदी व जाडी नियमाप्रमाणे का राखली जात नाही? असे प्रश्न असताना मंत्र्यांनी याची दखल घेतली नाही.

कोल्हापूर : शाहूपुरीत येथे दुचाकी-डंपरचा अपघात, १८ वर्षीय तरुण ठार

बहुतेक वेळा सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी त्यांच्या कार्यालयात उपलब्धच नसतात. रस्ता बांधणीच्या चुकीच्या नियोजनामुळे अपघातात अनेकांनी जीव गमावले, त्यांच्या मृत्यूबद्दल सदोष मनुष्यवधाचे गुन्हे ठेकेदार कंपनीवर का दाखल होत नाहीत? अपघातात मयत व जखमींना ठेकेदार कंपनीने नुकसान भरपाई का दिली नाही? प्रशासनाने त्यांना मोकळे सोडले आहे का? यामागे प्रशासनाची मजबुरी सर्वसामान्यांना कळेल का? असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहेत. याचा लोकप्रतिनिधी प्रशासनाला जाब विचारून संबंधित ठेकेदार कंपनीला धारेवर धरतील का, असा प्रश्न आता मुळशीकरांना पडला आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या निष्क्रियतेचा मुळशीत कळस

यासंबंधी विचारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी रणसिंग यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पुढील आठवड्यात रस्त्याचे काम सुरू होणार आहे. वन विभागाच्या हद्दीमधून एक किलोमीटर रस्ता गेला आहे. त्यांच्या तांत्रिक अडचणी सुटल्या की तोसुध्दा रस्ता रुंद करण्यात येईल.

 

Back to top button