सांगली :जिल्ह्यात जि.प.चे गट, पं.स.चे गण वाढणार | पुढारी

सांगली :जिल्ह्यात जि.प.चे गट, पं.स.चे गण वाढणार

सांगली/मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील जिल्हा परिषदांची सदस्य संख्या वाढविण्याच्या निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील सदस्य संख्याही वाढणार आहे. सध्या जिल्हा परिषदेचे 60 गट आणि पंचायत समितीचे 120 गण आहेत. त्यामध्ये नव्याने जिल्हा परिषदेचे गट 62 ते 65 पर्यंत होऊ शकतात.

सध्या राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी 50 व जास्तीत जास्त 75 इतकी आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 9 (1) मध्ये सुधारणा करून जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी 55 व जास्तीत जास्त 85 असे करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या सुधारणेमुळे सध्याची जिल्हा परिषद सदस्यांची संख्या 2000 वरून 2248 इतकी होईल. त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्यांची संख्या देखील 4000 वरून 4496 होईल.

प्रत्येक जिल्ह्याची लोकसंख्या विचारात घेऊन त्याठिकाणची सदस्य संख्या ठरवण्यात येणार आहे. 2012 मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सांगली जिल्हा परिषदेतील सदस्यसंख्या 62 वरुन 60 झाली होती. जत आणि पलूस नगरपरिषद तर कवठेमहांकाळ, खानापूर आणि कडेगाव याठिकाणी नगरपंचायत झाली.

त्यामुळे मोठ्या लोकसंख्येची गावे कमी झाल्याने जिल्हा परिषदेचे दोन गट कमी झाले होते. सध्या जिल्हा परिषदेचे 60 गट आणि पंचायत समितीचे 120 गण आहेत.गेल्या दहा वर्षामध्ये मतदारसंख्या वाढली आहे.

अद्याप 18 वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांचा समावेश सुरु आहे. त्यामुळे वाढलेली मतदारसंख्या लक्षात घेता जिल्हा परिषदेचे मतदारसंघ वाढणार असल्याचे स्पष्ट झाले. नव्या आदेशानुसार जिल्हा परिषदेचे 62 ते 65 पर्यंत गट होण्याची शक्यता आहे. पंचायत समितीचे 124 ते 130 गण होवू शकतात. लोकसंख्येनुसार प्रभाग रचनेचा आराखडा तयार केला जाणार आहे.

जि.प.मध्ये 248, तर पं.स.मध्ये 496 सदस्य वाढणार

सध्याची जिल्हा परिषद सदस्यांची संख्या 2 हजारांवरून 2 हजार 248 इतकी होईल. त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्यांची संख्यादेखील 4 हजारांवरून 4 हजार 496 इतकी होईल. ज्या जिल्ह्यांची लोकसंख्या कमी आहे .

त्या जिल्ह्यांत जिल्हा परिषद गटसंख्या ही 55 असेल. प्रत्येक जिल्ह्याची लोकसंख्या विचारात घेऊन, त्या जिल्ह्यांसाठी सर्वत्र एकच सूत्राचा अंगीकार करून जिल्हा परिषद गटाची संख्या ठरविण्यात येणार आहे.

Back to top button