universal travel pass : कोरोना काळात बाहेर फिरण्यासाठी असा काढा युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास | पुढारी

universal travel pass : कोरोना काळात बाहेर फिरण्यासाठी असा काढा युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास

मुंबई ः पुढारी वृत्तसेवा : universal travel pass : रेल्वे, बेस्ट, हवाई प्रवासासह मॉलमध्ये प्रवेशासाठी आता युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास आवश्यक आहे. ज्या नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस झाले आहेत, ती व्यक्‍ती स्वत: ऑनलाईनद्वारे पास काढू शकते. अनेक नागरिकांनी हा पर्याय निवडला आहे.

मात्र युनिव्हर्सल पास मिळाल्यावर तो कसा व कुठे वापरायचा तसेच रेल्वे प्रवासात पुन्हा लसीच्या दुसर्‍या डोसचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, आधी कागदपत्रांची पडताळणी होईल का, त्यासाठी ही कागदपत्रे जवळ बाळगावी लागणार का आदी प्रश्न नागरिकांना आहेत.

असा मिळवा universal travel pass

पात्र नागरिकांनी http://epassmsdma.mahait.org ही वेब लिंक उघडावी.

त्यातील ट्रॅव्हल पास फॉर व्हॅक्सिनेटेड सिटिझन यावर लिंक करा.

त्यानंतर आपला कोव्हिड लसीकरणासाठी नोंदविलेला मोबाईल क्रमांक नमूद करावा. त्यानंतर तत्काळ रजिस्टर मोबाईलवर ओटीपी अर्थात एकवेळ वापरासाठीचा पासवर्ड एसएमएसद्वारे प्राप्त होईल.

हा ओटीपी नमूद केल्यानंतर लाभधारकाचे नाव, मोबाईल क्रमांक, लाभधारकाचा संदर्भ क्रमांक आदी तपशील आपोआप समोर दिसतील.

त्यामध्ये पास निर्माण करा (जनरेट पास) या पर्यायावर क्लिक करावे.

त्यावर क्लिक करताच अर्जदाराचा तपशील तसेच कोव्हिड लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्याचा दिनांक आदी सर्व तपशील आपोआप दिसेल.

या तपशीलमध्ये सेल्फ इमेज या पर्यायामध्ये अर्जदाराने स्वत:चे छायाचित्र अपलोड करावे. ते मोबाईल गॅलरीतून अपलोड करता येऊ शकते किंवा मोबाईल कॅमेर्‍याद्वारे सेल्फी काढूनही अपलोड करता येईल.

ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील काही तासांमध्ये युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासकरिता एसएमएसद्वारे लिंक मिळेल.

लिंक आल्याल्यानंतर ई-पास मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवावा.

Back to top button