

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक ) पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गगनबावडा तालुक्यातील 66 पैकी 46 मतदार फेटे बांधून जिल्हा बँकेत दाखल करत पाटील यांनी आपली निवड बिनविरोध करण्याच्या द़ृष्टीने पहिले पाऊल टाकले.
उमेदवारी अर्ज दाखल ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक ) केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, आर्थिक अरिष्टातून बँक बाहेर काढून सक्षम करण्याचे काम ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह संचालक मंडळाने केले. मी यापूर्वी दहा वर्षे संचालक म्हणून काम केले आहे. गगनबावड्यातील 66 पैकी आज 46 मतदार सोबत आणले असून तिघेजण बाहेरगावी आहेत. गगनबावडा तालुक्याने 20 वर्षांपासून पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसह निवडणुकांत माझ्यावर विश्वास टाकला आहे.
बँकेत ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक ) आम्हा नेतेमंडळींची बैठक झाली. त्यामध्ये ज्या तालुक्यात बिनविरोध करणे शक्य आहे, तिथे प्रामाणिक प्रयत्न करण्याचे ठरले. राजकारण विरहित असाच जिल्हा बँकेचा कारभार असून तो यापुढेही तसाच ठेवला जाईल. ना. मुश्रीफ आणि माझा सर्व जागा बिनविरोध करण्याचा प्रयत्न आहे. आताची जिल्हा बँकेतील प्रत्येकाची आकडेवारी स्पष्ट आहे. त्याचा अभ्यास केल्यास बिनविरोध करण्यास अडचण वाटत नाही. जागा वाटपाबाबत सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा सुरू असून यानंतर राहिलेल्या नऊ जागांचा अंतिम फॉर्म्युला ठरेल, असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
'राजाराम'चे नंतर पाहू! ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक )
राजाराम साखर कारखाना निवडणुकीला अजून वेळ आहे. जिल्हा बँकेनंतर 'राजाराम'कडे पाहू. उच्च न्यायालयात सुनावणीचा निकाल येणे बाकी आहे. राजाराम कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्यानंतर यावर बोलू, असे ना. पाटील यांनी स्पष्ट केले.